मुनघाटे महाविद्यालयात नवागतांचे जल्लोषात स्वागत
– स्पिक मॅकेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत; व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रमांत सहभागी होण्याचे आवाहन
The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा, दि. २२ : दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था, गडचिरोलीद्वारा संचालित श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयात इंडक्शन विभाग व स्पिक मॅके यांच्या संयुक्त विद्यमाने नवागत विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात पार पडला. प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला उपप्राचार्य पी. एस. खोपे व उपप्राचार्य डॉ. अभय साळुंखे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील मोफत वाय-फाय, एनडीएल क्लब, सुसज्ज ग्रंथालय, अद्ययावत प्रयोगशाळा, जिम यांसह विविध सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. ‘केवळ पदवी मिळविणे हे अंतिम ध्येय नसून आदर्श विद्यार्थी व आदर्श नागरिक म्हणून व्यक्तिमत्त्व घडविणे महत्त्वाचे आहे,’ असे त्यांनी सांगितले.
जेन-झीच्या युगात चांगले-वाईट यातील फरक ओळखणे आवश्यक असून विद्यार्थ्यांनी नियमित महाविद्यालयात उपस्थित राहून प्राध्यापक, कर्मचारी व सहकाऱ्यांशी सुसंवाद साधावा, असा सल्लाही त्यांनी दिला. सहशालेय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत व्यक्तिमत्त्व विकास साधावा. तसेच सायबर क्राईमपासून बचावाबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
स्पिक मॅकेचे राष्ट्रीय समन्वयक डे यांनी आभासी माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. उपप्राचार्य पी. एस. खोपे यांनी विद्यार्थिनींना शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन करत रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.
उपप्राचार्य डॉ. अभय साळुंखे यांनी स्पिक मॅके ही सुमारे ५० वर्षांपासून कार्यरत असलेली संस्था असून महाविद्यालयाने तिच्याशी करार केला असल्याची माहिती दिली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना गायन, वादन, नृत्य, नाटक, नक्कल आदी कलांचे राष्ट्रीय स्तरावर सादरीकरण करण्याची संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी स्पिक मॅकेच्या विविध उपक्रमांत सहभागी होऊन आपल्या कलागुणांना वाव देण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या-आपल्या विभागाची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी नवागतांच्या स्वागत सोहळ्याला रंगत आणली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गुणवंत वडपल्लीवार यांनी केले. संचालन डॉ. गणेश सातपुते यांनी, तर आभार डॉ. रवींद्र विखार यांनी मानले.













