गडचिरोलीच्या वेशीवर रानटी हत्तींचा कळप दाखल : शेतपिकांचे मोठे नुकसान
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०२ : जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या माडेतुकूम परिसरात रानटी हत्तींच्या कळपाने मध्यरात्री अक्षरशः धुमाकूळ घातला. गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात भटकंती करणारा हा कळप अखेर जिल्हा मुख्यालयाच्या वेशीवर पोहचला असून, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, कालपर्यंत हा हत्तींचा कळप चुरचुरा जंगल परिसरात वावरत होता. मात्र मध्यरात्री अचानक माडेतुकूम परिसरात दाखल झाल्यानंतर गावाजवळील शेतांमध्ये धुमाकुळ घातला. हत्तींच्या कळपाने धान पिकांचे मोठे नुकसान केल्याचे प्राथमिक अंदाजानुसार समजते. अचानक झालेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी सकाळी घटनास्थळी दाखल झाले आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे पंचनामे सुरू केले.
दरम्यान, हत्तींच्या कळपाची हालचाल अद्यापही सुरू असल्याने वनविभागाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
हत्तीजवळ न जाणे, व्हिडिओ किंवा सेल्फी न घेणे, तसेच रात्रीच्या वेळी बाहेर न पडणे याबाबतही इशारा देण्यात आला आहे.
#thegadvishva #thegdv #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #WildElephants #Madetukoom #ForestDepartment #ElephantAttack #FarmDamage #WildlifeAlert #MaharashtraNews #GadchiroliDistrict #RuralNews














