पैसे भरले, तरी सोलर पंपाची प्रतीक्षाच!; शेतकरी कामगार पक्षाचा आंदोलनाचा इशारा

15

पैसे भरले, तरी सोलर पंपाची प्रतीक्षाच!; शेतकरी कामगार पक्षाचा आंदोलनाचा इशारा
– सहा महिने उलटूनही पंप बसविले नाहीत; विद्युत विभागाला बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा
The गडविश्व
मुलचेरा, दि. १९ : तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांनी सोलर पंपासाठी आपल्या हिस्स्याची अग्रीम रक्कम शासनाकडे भरून सहा महिने उलटले आहेत. मात्र, अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सोलर पंप बसविण्यात आले नसल्याने सिंचनासाठी शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे. प्रलंबित सोलर पंप तातडीने बसवून द्यावेत, अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मुलचेरा तालुका शेतकरी कामगार पक्षाने दिला आहे.
यासंदर्भात पक्षाच्या वतीने आलापल्ली येथील विद्युत विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार, फेब्रुवारी महिन्यात पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या हिस्स्याची अग्रीम रक्कम ऑनलाइन पद्धतीने शासनाकडे जमा केली. मात्र, रक्कम भरूनही सहा महिन्यांचा कालावधी लोटला असताना सोलर पंप बसविण्यात आलेले नाहीत. विद्युत विभागाच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाने केला आहे.
शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न लक्षात घेता विद्युत विभागाने कोणतीही दिरंगाई न करता लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतात सोलर पंप बसविण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
“सोलर पंप तातडीने बसवून दिले नाहीत, तर आलापल्ली येथील विद्युत विभागाच्या कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा पक्षाचे मुलचेरा तालुका चिटणीस भाई चिरंजीव पेंदाम यांनी दिला.
यावेळी हरिदास तोरे, साईनाथ सेडमाके, भुरू पेंदाम, रोशन मडावी, गुरुदास सेडमाके, आशिष पेंदाम यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here