हॉटेलला भीषण आग ; चिमुकल्यासह ९ जणांचा होरपळून मृत्यू
– मिर्झा गालिब स्ट्रीटवर पहाटेची दुर्घटना, धुरामुळे अनेकांचा गुदमरून मृत्यू
The गडविश्व
कोलकाता,दि. १९ : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता बुधवारी पहाटे भीषण आगीच्या घटनेने हादरली. शहरातील गजबजलेल्या मिर्झा गालिब स्ट्रीटवरील एका हॉटेलला अचानक आग लागून एका लहान मुलासह तब्बल ९ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
बुधवारी (१९) पहाटेच्या सुमारास हॉटेलमधील पर्यटक गाढ झोपेत असतानाच आग भडकली. काही क्षणांतच आगीने हॉटेलच्या खोल्या आणि कॉरिडॉरमध्ये फैलावत दाट धुराचे साम्राज्य निर्माण केले. झोपेतून जागे झालेल्या पर्यटकांमध्ये एकच धावपळ उडाली. धुरामुळे श्वास घेणे कठीण झाल्याने अनेकांना बाहेर पडता आले नाही. काही जणांनी कसाबसा जीव वाचवत हॉटेलबाहेर धाव घेतली, तर काहीजण आतच अडकून पडले.
घटनास्थळाजवळच अग्निशमन दलाचे कार्यालय असल्याने आगीची माहिती मिळताच अग्निशमन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या चार बंबांच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. त्याचबरोबर हॉटेलमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवण्यात आली.
आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, आगीचे निश्चित कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
या दुर्घटनेनंतर हॉटेलमधील अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हॉटेलमध्ये पुरेशी अग्निशमन उपकरणे उपलब्ध होती का, फायर अलार्म यंत्रणा कार्यरत होती का आणि आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठीचे मार्ग मोकळे होते का, याची पोलीस आणि अग्निशमन दलाकडून चौकशी सुरू आहे.
दरम्यान, या दुर्घटनेमुळे शहरातील हॉटेल्सच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirlinew #ghadchirolipolice #Kolkata #KolkataFire #HotelFire #MirzaGhalibStreet #WestBengal #BreakingNews #FireAccident #HotelFireTragedy #FireSafety #KolkataNews #WestBengalNews #BreakingNewsIndia #IndiaNews #FireIncident #TragicAccident













