तीन विद्यार्थिनींचा मृत्यू ; जबाबदार फक्त संस्थाचालकच का?

17

तीन विद्यार्थिनींचा मृत्यू ; जबाबदार फक्त संस्थाचालकच का?
– जपतलाई आश्रमशाळा प्रकरणी तपासणी अधिकारी व अनुदान यंत्रणेचीही चौकशी करा ; डॉ. कोरेट्टींची मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ :धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या घटनेने आश्रमशाळांच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात केवळ संस्थाचालकांवर कारवाई न करता आश्रमशाळेची तपासणी करणारे अधिकारी, अनुदान मंजूर व वितरित करणारी यंत्रणा तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांचीही सखोल चौकशी करावी, अशी मागणी जय सेवा युवा प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष डॉ. आशिष मनोहर कोरेट्टी यांनी केली.
परिषदेत मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत त्यांनी विविध मागण्या मांडल्या. आश्रमशाळेची नियमित तपासणी झाली होती का, विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था, स्वच्छता, खाटा, सर्पप्रतिबंधक उपाययोजना आणि परिसराची पाहणी करण्यात आली होती का, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
मागील तीन ते पाच वर्षांत आश्रमशाळेला मिळालेल्या देखभाल व परिरक्षण अनुदानाचा तसेच प्रत्यक्ष खर्चाचा तपशील सार्वजनिक करावा. खर्चाची बिले, व्हाउचर, उपयोगिता प्रमाणपत्रे आणि तपासणी अहवालांचीही तपासणी करावी, अशी मागणी डॉ. कोरेट्टी यांनी केली.

‘FIR दाखल झाल्याने प्रकरण संपत नाही’

“FIR दाखल झाल्याने प्रकरण संपत नाही. आश्रमशाळेची तपासणी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची भूमिका, पूर्वीचे तपासणी अहवाल आणि अनुदानाच्या वापराची चौकशी झाली पाहिजे. दोषी आढळणाऱ्या प्रत्येकावर कायद्यानुसार कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची विशेष सानुग्रह मदत द्यावी, तसेच जखमी विद्यार्थिनींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाने करावा, अशी मागणी करण्यात आली. जपतलाई परिसरातील रस्त्यांचे तांत्रिक ऑडिट करून आवश्यक दुरुस्ती तातडीने करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.

राज्यातील सर्व आश्रमशाळांचे सुरक्षा ऑडिट

महाराष्ट्रातील सर्व आश्रमशाळांचे स्वतंत्र सुरक्षा ऑडिट करून प्रत्येक आश्रमशाळेत स्थानिक विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करावी, अशी मागणी प्रतिष्ठानने केली. आश्रमशाळांच्या सुरक्षा व प्रशासकीय व्यवस्थेबाबत नैतिक जबाबदारी स्वीकारून आदिवासी विकास मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
“तीन मुलींचा मृत्यू विसरला जाणार नाही. दोषी कोणताही असो, त्याला कायद्यापुढे आणले पाहिजे. ठोस निर्णय न झाल्यास लोकशाही व कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा डॉ. कोरेट्टी यांनी दिला.
पत्रकार परिषदेला आरती कोल्हे, वनिता ताराम, शारदा मडावी, डॉ. प्रशांत उईके, सारंग जांभुळे, शिवकुमार भैसारे, श्रीकांत आतला, श्रेयश नैताम आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here