दुर्गंधी, घाण आणि आजारांचा धोका; कोंढाळ्यात ग्रामपंचायतीविरोधात रोष

32

दुर्गंधी, घाण आणि आजारांचा धोका; कोंढाळ्यात ग्रामपंचायतीविरोधात रोष
– सांडपाणी व कचऱ्यामुळे शेतरस्त्याची दयनीय अवस्था, दोन दिवसांत कारवाई न झाल्यास मोर्चाचा इशारा
The गडविश्व
ता. प्र/ देसाईगंज, दि. ३० : गावातील अंतर्गत नाल्यांचे दूषित सांडपाणी आणि कचरा शेताकडे जाणाऱ्या मुख्य मेढा रस्त्यावर साचल्याने नागरिक, शेतकरी तसेच महिला शेतमजुरांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दुर्गंधी, अस्वच्छता आणि संसर्गजन्य आजारांचा वाढता धोका लक्षात घेता नागरिकांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त होत असून, या समस्येच्या निराकरणासाठी गुरुवारी ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिव यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, रस्त्यावर साचलेल्या दूषित सांडपाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांना दररोज या अस्वच्छ पाण्यातून मार्ग काढावा लागत असून, त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दूषित पाण्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सदर मार्गाचा शेतकरी, महिला शेतमजूर आणि इतर नागरिक मोठ्या प्रमाणात वापर करतात. मात्र, रस्त्यावर साचलेले सांडपाणी व कचऱ्यामुळे शेतात ये-जा करणे कठीण झाले असून, नागरिकांना दररोज गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
या समस्येबाबत ग्रामपंचायतीकडे यापूर्वी अनेकदा तोंडी सूचना देण्यात आल्याचा दावा निवेदनकर्त्यांनी केला आहे. मात्र, अद्याप कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.
रस्त्यावर साचलेले दूषित पाणी व कचरा तात्काळ हटविण्यात यावा, नाल्यांचा योग्य निचरा करण्यात यावा, कायमस्वरूपी जलनिस्सारण व्यवस्था उभारण्यात यावी तसेच परिसराची स्वच्छता करून निर्जंतुकीकरण करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, येत्या दोन दिवसांत समस्येवर ठोस कारवाई न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयावर शेतकरी व महिलांचा मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. सदर निवेदन नागोराव उके व सुनील पारधी यांनी ग्रामपंचायतीकडे सादर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here