रंगभूमीची सेवा करणाऱ्या कलाकारांचे योगदान अभिनंदनिय : माजी आ. कृष्णा गजबे
– कढोली येथे ‘महाकाल’ या नाट्यप्रयोगाप्रसंगी प्रतिपादन
The गडविश्व
ता. प्र/कुरखेडा, दि. २९ : नाट्य रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून सामाजिक प्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. या माध्यमातून समाजजागृती करत अविरत सेवा देणाऱ्या कलाकारांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण व अभिनंदनीय आहे, असे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांनी केले.
ते अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा नाट्य कला मंडळ शाखा कढोली, साईबाबा मंदिर येरंडी, आदर्श गणेशोत्सव मंडळ येरंडी व गावकरी मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम नवमीच्या निमित्ताने आयोजित ‘महाकाल’ या नाट्यप्रयोगाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जीवन पाटील नाट यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, भाजप तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा प्रमुख किशोर तलमले, माजी पंचायत समिती सभापती प्रभाकर तुलावी, गोठणगाव ग्रामपंचायतीचे प्रशासक राम लांजेवार, ज्येष्ठ नाट्यलेखक चुडाराम बल्लारपुरे, आरोग्यधाम संस्थेचे अध्यक्ष डॉ. रमेश कटरे, माजी सभापती गिरधारी तितराम, वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास धोंडने यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नाटककार चुडाराम बल्लारपुरे, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, प्रल्हाद मेश्राम, जराते महाराज, विठ्ठल खानोलकर, विश्वंभर गहाणे, केवळ बगमारे व दीनानाथ बाळबुद्धे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात डॉ. परशुराम खुणे, जीवन पाटील नाट, चांगदेव फाये, चुडाराम बल्लारपुरे, प्रभाकर तुलावी व राम लांजेवार यांनी मार्गदर्शन करत नाट्यकलेचे महत्त्व अधोरेखित केले.
‘महाकाल’ या नाट्यप्रयोगात विठ्ठल खानोलकर, दिवाकर बारसागडे, किरपाल सयाम, प्रभाकर गडपायले, नरहरी माकडे, प्रल्हाद मेश्राम, जराते, लालचंद धाबेकर, भास्कर शेंद्रे, संजय आष्टेकर, सेयर परे, विजू धारने, लतेश्वर लोणारे, छगन मंडावी यांच्यासह बालकलाकार प्रेमकुमार मुंगणकर, सविता भोयर, अनुराधा कांबळे, अर्चना सुरते, चंद्रशेखर मेश्राम, राजेश राऊत आदी कलाकारांनी प्रभावी भूमिका साकारून उपस्थितांची दाद मिळवली.
नाट्यप्रयोगाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष दुर्गेश मुंगणकर, उपाध्यक्ष गणेश मडावी, सचिव संतोष मडावी, कोषाध्यक्ष राहुल लोहंबरे तसेच छगन मडावी, विश्वंभर गहाणे व सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.














