वरातीवर काळाचा घाला! गडचिरोली-चामोर्शी मार्गावर ट्रॅव्हल्स-स्कॉर्पिओची भीषण धडक : ५ ठार

235

वरातीवर काळाचा घाला! गडचिरोली-चामोर्शी मार्गावर ट्रॅव्हल्स-स्कॉर्पिओची भीषण धडक : ५ ठार
The गडविश्व
गडचिरोली, दि. २९ : हसत-खेळत, लग्नाचा आनंद साजरा करून परतणारी वरात… गाण्यांच्या तालावर सुरू असलेला प्रवास… आणि क्षणात सर्व काही काळाच्या पडद्याआड. गडचिरोली-चामोर्शी मार्गावर रविवार २९ मार्च रोजी सायंकाळी झालेल्या भीषण अपघाताने आनंदाचा हा प्रवास शोकसभेत बदलला. ट्रॅव्हल्स बस आणि स्कॉर्पिओ यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत ५ जणांचा जागीच मृत्यू, तर ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुरुड-कढोली गावादरम्यान नाल्याजवळील धोकादायक वळणावर सायंकाळी सुमारे ६.४५ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. एमएच ४६ पी ५३९२ क्रमांकाच्या स्कॉर्पिओमधून एकूण १६ प्रवासी रामपूर येथील लग्न समारंभ आटोपून भाडभीडी मोकासा येथे परतत होते. त्याचवेळी गडचिरोलीहून चामोर्शीकडे जात असलेल्या एमएच १५ सीके ५००५ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्स बसशी त्यांची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की स्कॉर्पिओ वाहनाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. काही प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमींना तातडीने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारासाठी नेत असताना वाटेतच आणखी दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
उर्वरित जखमींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
या हृदयद्रावक घटनेमुळे लग्नाच्या आनंदावर दु:खाचे सावट दाटले असून परिसरात शोककळा पसरली आहे.

‘डेथ ट्रॅक’कडे वाटचाल?

गडचिरोली-चामोर्शी मार्गावर वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, हा मार्ग ‘डेथ ट्रॅक’ ठरत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. धोकादायक वळणांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #accident #BreakingNews #Gadchiroli #RoadAccident #TragicAccident #WeddingTragedy #AccidentNews #MaharashtraNews #FatalCrash #RoadSafety #IndiaNews #Breaking #AccidentAlert #SadNews #Emergency #PublicSafety

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here