रामगड ग्रामपंचायतच्या नळाच्या पाण्यात ‘नारू’
– नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
The गडविश्व
ता. प्र./ कुरखेडा, दि. २९ : रामगड ग्रामपंचायत अंतर्गत घराघरांत पुरवठा होणाऱ्या नळाच्या पाण्यात धोकादायक “नारू” (Dracunculus medinensis) आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाण्याची टाकी दीर्घकाळ स्वच्छ न केल्यामुळे दूषित पाण्याचा पुरवठा सुरू असल्याचे समोर आले आहे.
श्रीमती शोभा जनार्धन मेश्राम यांच्या नळातील पाण्यात नारूचे डिंभ आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या संसर्गामुळे त्वचेवर फोड, व्रण निर्माण होऊन गंभीर आजार उद्भवू शकतात. काही प्रकरणांमध्ये गँगरीन किंवा धनुर्वाताचा धोका संभवतो.
तज्ज्ञांच्या मते दूषित पाण्याचा तातडीने उपसा करून पाण्यात क्लोरिन मिसळणे आवश्यक आहे. नागरिकांनी पाणी उकळून किंवा शुद्ध करूनच वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीकडून पाणी स्वच्छता व सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.














