धानोरा : अवैध सागवान-बिजा कटाईवर वनविभागाची धडक कारवाई, तिघे अटकेत

119

अवैध सागवान-बिजा कटाईवर वनविभागाचा धडक कारवाई: तिघे अटकेत
The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. २९ : धानोरा तालुक्यातील मेंढा गावालगतच्या सामूहिक वनहक्क प्राप्त जंगल परिसरात अवैधरित्या सागवान व बिजा लाकडाची कटाई करणाऱ्या तिघांविरुद्ध वनविभागाने धडक कारवाई करत त्यांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये चिन्नु रैनु दुगा, कालीदास बिहु आतला व संतोष देवराव तोफा (सर्व रा. मेंढा, ता. धानोरा) यांचा समावेश आहे. २६ मार्च रोजी सकाळी वनकर्मचारी गस्तीवर असताना मेंढा गावालगत संतोष तोफा यांच्या शेतात सागवान व बिजा या मौल्यवान इमारती लाकडाचे अवैध चिराण सुरू असल्याचे आढळून आले.
वनविभागाने तत्काळ कारवाई करत घटनास्थळावरून १९ सागवान व २ बिजा असे एकूण २१ नग लाकूड जप्त केले. प्राथमिक तपासात हे लाकूड सामूहिक वनहक्क प्राप्त जंगलातून आणल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपींना २८ मार्च रोजी अटक करण्यात आली. न्यायालयाने तिघांनाही ३० मार्चपर्यंत वनकोठडी सुनावली आहे. तसेच या प्रकरणात इतर काही व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने वनविभागाकडून सखोल तपास सुरू आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक आर्या व्ही. एस. व सहाय्यक वनसंरक्षक अंबरलाल मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण धानोरा वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित डी. पुरमशेट्टिवार यांच्या नेतृत्वात करण्यात आली असून पुढील तपास वनकर्मचारी करीत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here