कुरखेडा : ‘शौचास गेला अन् परतलाच नाही…’ आश्रम शाळेतील विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू

156

कुरखेडा : ‘शौचास गेला अन् परतलाच नाही…’ आश्रम शाळेतील विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू
– शाळा व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. २९ : तालुक्यातील वडेगाव येथील आश्रम शाळेत शिकणाऱ्या एका निष्पाप ८ वर्षीय विद्यार्थ्याचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून शाळा व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला जात आहे.
वेदांत शंकर पदा (वय ८, रा. नवेझरी, ता. कुरखेडा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो क्रांतीवीर नारायणसिंह उईके आदिवासी आश्रम शाळा, वडेगाव येथे इयत्ता दुसरीत शिक्षण घेत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, 27 मार्च रोजी दुपारी सुमारे २.५० वाजण्याच्या सुमारास वेदांत हा शाळेच्या पाठीमागील तलावाकडे शौचासाठी गेला असताना त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. काही वेळाने ही बाब लक्षात येताच शाळेतील कर्मचारी, विद्यार्थी यांनी घटनास्थळी धाव घेत त्याला पाण्याबाहेर काढले. त्या वेळी तो हालचाल करत असल्याने त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा येथे हलविण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी कुरखेडा पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास कुरखेडा पोलीस करीत आहेत.

शाळा व्यवस्थापनावर सवालांची सरबत्ती

या घटनेनंतर शाळा व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. एवढ्या लहान वयाच्या विद्यार्थ्याला शाळेबाहेरील धोकादायक तलावाकडे जाण्याची वेळ का आली? शाळेत शौचालयांची सुविधा उपलब्ध नाही का? असल्यास विद्यार्थ्यांवर देखरेख का नव्हती?
इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडे शिक्षकांचे पुरेसे लक्ष होते का? विद्यार्थी शाळेच्या परिसरातून बाहेर गेला तरी कोणालाही कसे लक्षात आले नाही? अशा अनेक प्रश्नांनी आता जोर धरला असून आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची मागणी होत आहे.
या दुर्दैवी घटनेने एक निष्पाप जीव गमावला गेला असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक उपाययोजना आवश्यक असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews #wadegao #kurkheda #kurkhedalocalnews #ipl2026 #ipl #mumbai #

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here