कुरखेडा : उन्हाळी धानासह मका खरेदी केंद्र तातडीने सुरू करा
The गडविश्व
ता. प्र/कुरखेडा, दि. २० : कुरखेडा तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात मका लागवड होऊन उत्पादन चांगले आले असले तरी बाजारात योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर उन्हाळी धान खरेदी केंद्रासह मका खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी भाजपा तालुका अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांनी प्रशासनाकडे केली आहे.
तालुक्यातील तसेच गडचिरोली जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी शेतीवर अवलंबून असून यंदा धानासोबत मक्याचीही मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. सध्या काढणी सुरू असताना अनेक शेतकऱ्यांकडे साठवणुकीची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कमी दरात मका विक्री करावी लागत आहे. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, बाजारात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात मका येत असल्याने दर घसरत आहेत. अशा परिस्थितीत शासनामार्फत हमीभावाने खरेदी केंद्र सुरू झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून धान खरेदी केंद्रासह मका खरेदी केंद्र सुरू करणे अत्यावश्यक असल्याचे फाये यांनी नमूद केले आहे.
मका खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत शेतकरी वर्गात मोठी अपेक्षा असून, लवकर निर्णय न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रशासनाने त्वरित सकारात्मक पाऊल उचलावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.













