‘नक्षलवाद सोडा, कुटुंबाकडे परत या’ : आत्मसमर्पित ललिताची भावनिक साद
The गडविश्व
गडचिरोली, दि. २० : ‘नक्षलवादाच्या मार्गावर काहीच मिळत नाही. आयुष्य उद्ध्वस्त होते आणि कुटुंबापासून दुरावा निर्माण होतो. त्यामुळे हिंसेचा मार्ग सोडून कुटुंबाकडे परत या आणि सामान्य जीवन जगा,’ अशी भावनिक साद आत्मसमर्पित नक्षलवादी संगीता उर्फ ललिताने आपल्या माजी सहकाऱ्यांना घातली आहे.
सुमारे २२ वर्षे (२००२ पासून) नक्षल चळवळीत सक्रिय राहिलेल्या ललिताने जंगलातील कठीण, अस्थिर आणि संघर्षमय जीवनाचा दीर्घ अनुभव घेतला. मात्र या काळात कोणताही सकारात्मक बदल घडत नसल्याची जाणीव झाल्यानंतर तिने हिंसेचा मार्ग सोडण्याचा निर्णय घेतला. तिने आपल्या पती गिरिधर तुमरेती व इतर साथीदारांसह २२ जून २०२४ रोजी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.
‘नक्षल चळवळीत राहून स्वतःचे आणि कुटुंबाचे आयुष्य अंधारात जाते. त्यामुळे मी संविधानिक मार्गाचा स्वीकार केला,’ असे सांगत तिने उर्वरित नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन केले. ‘उगीच जंगलात भटकू नका. तुमचे आई-वडील आणि कुटुंबीय तुमची वाट पाहत आहेत. त्यांच्या आनंदासाठी आणि स्वतःच्या उज्ज्वल भविष्यासाठी आत्मसमर्पण करा,’ असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनीही उर्वरित नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून शासनाच्या पुनर्वसन योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. शासनाकडून आत्मसमर्पितांसाठी विविध योजना राबविल्या जात असून, ओळखपत्रे, आर्थिक सहाय्य, निवास, शिक्षण तसेच रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.
या योजनांचा लाभ घेऊन आत्मसमर्पितांना सन्मानाने नवे आयुष्य सुरू करण्याची संधी मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolinaxal #naxal













