चंद्रपूर–गडचिरोली महामार्गावर काळाचा घाला : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार दोघांचा जागीच मृत्यू ; एक गंभीर
The गडविश्व
सावली, दि. १६ : Cylinder–गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर सावली तालुक्यातील हिरापूर फाट्याजवळ मंगळवारी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला असून एक युवक गंभीर जखमी झाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मोहूर्ली येथील नागेश भगत, मशाखेत्री व सौरभ मांडवकर हे तिघे एमएच-३३ बी-७९८६ क्रमांकाच्या दुचाकीवरून प्रवास करीत असताना हिरापूर फाट्याजवळ भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या भीषण धडकेमुळे नागेश भगत व मशाखेत्री यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर सौरभ मांडवकर हा युवक गंभीर जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच सावली पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, मुल येथे पाठविण्यात आले असून गंभीर जखमी सौरभ मांडवकर यास प्राथमिक उपचारानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे.
अपघातानंतर घटनास्थळी विदारक दृश्ये पाहून उपस्थित नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. महामार्गावरील वेग, निष्काळजी वाहनचालक आणि अज्ञात वाहन पसार होण्याच्या घटनांमुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. सदर अपघात नेमका कसा घडला व धडक देणारे वाहन कोणते, याचा तपास सावली पोलीस करीत असून पुढील कारवाई सुरू आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #chandrpurnews #accident













