कोरची पोलिसांची धडक कारवाई ; ३० किलो गांजासह आरोपीस अटक
– १५.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त
The गडविश्व
ता.प्र / कोरची, दि. ६ : कोरची तालुक्यात अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत हितकसा परिसरात गांजाची अवैध लागवड व साठा उघडकीस आणला. या प्रकरणी पोलिसांनी ३०.३७५ किलो गांजासह एकूण १५ लाख १९ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एका आरोपीस अटक केली आहे.
५ जानेवारी २०२६ रोजी गडचिरोली स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, कोरची पोलीस ठाण्याच्या पथकाने पंच, वजनमापारी व नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत हितकसा येथे छापा टाकला. यावेळी आरोपी पुनाराम अलीसाय मडावी (वय ४५, रा. हितकसा, ता. कोरची) यांच्या घराची कायदेशीर झडती घेण्यात आली.
झडतीदरम्यान घरातून गांजाची ओली झाडे तसेच अर्धवट सुकलेला ३०.३७५ कि.ग्रॅम गांजा (फुले, पाने व बोंडे) उग्र वासासह आढळून आला. प्रति किलो ५० हजार रुपये दराने त्याची किंमत १५,१८,७५० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले. तसेच गांजाचे वजन मोजण्यासाठी वापरण्यात येणारा इलेक्ट्रिक काटा (किंमत १,००० रुपये) देखील जप्त करण्यात आला.
तपासात आरोपीने आर्थिक फायद्यासाठी व्यापारी तत्त्वावर गांजाची लागवड करून उत्पादन व साठा केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलीस ठाणे कोरची येथे एनडीपीएस अधिनियम, १९८५ अंतर्गत कलम ८(सी), २०(बी)(ii)(सी) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आरोपीस ५ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११.५६ वाजता अटक करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख करीत आहेत. तालुक्यात अमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews #korchinews #crimenews













