कुरखेड्यातील ‘हिरकणी कक्ष’ कुलूपबंदच
– स्तनदा मातांसाठीची सरकारी सुविधा केवळ कागदावर!
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ७ : स्तनपान करणाऱ्या मातांसाठी शासनाने अभिमानाने सुरू केलेला ‘हिरकणी कक्ष’ कुरखेड्यात मात्र प्रशासनाच्या उदासीनतेचा बळी ठरत असल्याचे संतापजनक चित्र समोर आले आहे. पंचायत समिती व तहसील कार्यालय परिसरात उभारलेले हे कक्ष बांधकाम पूर्ण होताच कुलूपबंद ठेवण्यात आल्याने स्तनदा मातांसाठीची ही महत्त्वाची सुविधा अक्षरशः निष्प्रभ ठरली आहे.
कार्यालयीन कामानिमित्त येणाऱ्या महिला कर्मचारी तसेच नागरिकांना बाळाला सुरक्षित, खाजगी व स्वच्छ वातावरणात स्तनपान करता यावे किंवा दूध काढून साठवता यावे, यासाठी राज्य सरकारच्या निर्देशानुसार हिरकणी कक्षांची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, कुरखेड्यात हे कक्ष केवळ उद्घाटनापुरते मर्यादित राहिल्याचे स्पष्ट होत आहे.
कक्षांना कायम कुलूप असल्याने एकाही स्तनदा मातेला या सुविधेचा लाभ मिळालेला नाही. परिणामी, महिलांना गैरसोय, मानसिक ताण आणि अस्वस्थ परिस्थितीत बाळाची काळजी घ्यावी लागत आहे. कक्ष उघडा ठेवण्यासाठी जबाबदार अधिकारी नेमण्यात आले नाहीत का? की ही योजना केवळ फाईलमध्येच जिवंत आहे? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक व कर्मचारी उपस्थित करत आहेत.
राज्यभरात हिरकणी कक्षांच्या दुर्लक्षाच्या तक्रारी समोर येत असल्या तरी ग्रामीण भागात ही समस्या अधिक गंभीर असल्याचे येथे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून हिरकणी कक्ष कार्यान्वित करावेत, अन्यथा ही योजना मातांसाठीची मदत न राहता केवळ सरकारी दिखावा ठरेल, असा आरोप नागरिकांकडून होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #kurkhedanews













