गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनतर्फे मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा

50

गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनतर्फे मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा
– पत्रकारितेची मूल्ये जपण्याचा सामूहिक संकल्प; संघटन बळकटीवर भर
The गडविश्व
गडचिरोली, दि. ६ : मराठी पत्रकारितेचे जनक ‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी पत्रकार दिन गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनच्या वतीने शहरातील इंदिरा गांधी चौक येथील शासकीय विश्रामगृहात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ पत्रकार जयंत निमगडे यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष उदय धकाते होते. प्रमुख अतिथी म्हणून ‘आजतक’चे व्यंकटेश दुडमवार व अनिल बोदलकर उपस्थित होते.
यावेळी संयोजक तिलोत्तमा समर हाजरा, प्रा. श्रीमंत सुरपाम, निलेश सातपुते, सुरज हजारे, कृष्णा वाघाडे, म्हशाखेत्री आदी सदस्यांची उपस्थिती लाभली. उपस्थित पत्रकारांनी मराठी पत्रकारितेच्या जडणघडणीत आचार्य जांभेकर यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचा गौरव केला. सत्य, निर्भीडता व समाजाभिमुखता ही पत्रकारितेची मूलभूत मूल्ये जपण्याचा संकल्प सर्वांनी व्यक्त केला.
कार्यक्रमादरम्यान गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनच्या कार्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. संघटनेची एकजूट अधिक मजबूत करणे, पत्रकारांच्या हक्कांसाठी संघटितपणे लढा देणे तसेच संघटना अधिक सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात आला. संघटन बळकटीसाठी सर्व सदस्यांनी एकत्र येऊन सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.
याप्रसंगी जिल्ह्यातील डिजिटल मीडियाचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन निलेश सातपुते यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुरज हजारे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here