कुरखेडा पोलिसांची धडक कारवाई ; गोवंशाची अवैध वाहतूक करणारे तिघे अटकेत

97

– १० लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २४ : तालुक्यातील भगवानपूर–शिरपूर मार्गावर गोवंशाची अवैध वाहतूक थांबविण्यासाठी कूरखेडा पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात तीन आरोपी रंगेहाथ अडकले. चारचाकी पिकअप वाहनातून कत्तलीच्या उद्देशाने ९ गायींची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी वाहनचालक, क्लिनर आणि जनावरांचा खरेदीदार अशा तिघांना अटक करण्यात आल्याची कारवाई २४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता करण्यात आली.
गोपनीय माहितीच्या आधारे कुरखेडा पोलिसांनी भगवानपूर–शिरपूर मार्गावर पाळत ठेवत सापळा रचला. दरम्यान, संशयित पिकअप वाहन (क्र. MH 40 BG 8002) तपासणीस थांबविले असता, त्यामध्ये ९ गायींची अवैध वाहतूक सुरू असल्याचे आढळले. तत्काळ चालक जयंत कांबळे (३०), क्लिनर अमित गेडाम (२४, दोन्ही रा. रावणवाडी, ता. देसाईगंज) आणि जनावर मालक मोहम्मद सोफीयान कुरैशी (२७, रा. देसाईगंज) यांना ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत ९० हजार रुपये किंमतीची जनावरे आणि १० लाख किंमतीचे वाहन असा एकूण १० लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्राण्यांवर क्रूरतेने वागणूक केल्याप्रकरणी तसेच गोवंशाच्या अवैध वाहतूकीसंबंधी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई ठाणेदार महेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप ताराम, दयानंद भोंबे, तसेच पोलिस शिपाई संदेश भैसारे, कैलाश नेवारे, नरसिंग कोरे आणि प्रकाश साबळे यांच्या पथकाने राबविली. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध गोवंश वाहतूक साखळीला मोठा धक्का बसला आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #crimenews #kurkhedanews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here