१५० कोटींहून अधिक रकमेच्या खोट्या परताव्यासंदर्भातील एकास महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभागाकडून अटक

321

The गडविश्व
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागाकडून बोगस कर परताव्यासंदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत किरण लखमशी भानुशाली, (वय २८ वर्षे) यांस १२ एप्रिल २०२२ रोजी अटक करण्यात आली.
मे आऊटसोर्स ऑप्टिमायझेशन (ओपीसी ) प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीबाबत वस्तू व सेवा कर विभागाकडून अन्वेषण कार्यवाही सुरु करण्यात आली होती. भानुशाली या कटातील मुख्य सूत्रधार असून त्याने खोट्या कंपन्या तयार करुन, आर्थिक लाभ लाटून शासकीय महसुलाची मोठी हानी केली आहे. या कंपनीमार्फत आतापर्यंत १५० कोटींहून अधिक रकमेचा बोगस कर परतावा फसवणुकीने प्राप्त केला असल्याचे आढळून आले. या प्रकरणी वस्तू व सेवा कर विभागाला १५० कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आणण्यात यश प्राप्त झाले आहे. या प्रकरणात इतर सूत्रधारांचा शोध घेण्यात येत आहे.
महानगर दंडाधिकाऱ्यांनी संबंधितास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. धडक कार्यवाही अन्वेषण क विभागाचे अजित एस. विशे, शदर दा. सोनावणे, अनिल ज. यमगर, रुपाली काळे, बापूराव व्हि गिरी व बाळकृष्ण क्षिरसागर या सर्व सहायक राज्यकर आयुक्तांनी संयुक्तपणे राबवली. या कार्यवाहीत राज्यकर निरीक्षकांचे महत्त्वाचे योगदान राहिले. ही संपूर्ण कार्यवाही महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभागातील अन्वेषण-क विभागाचे राज्यकर उपायुक्त दिपक प्रभाकर गोजमगुंडे व अनिल भंडारी (भा.प्र.से.), राज्यकर सहआयुक्त, अन्वेषण-क यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या मोहिमेद्वारे महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभागाने करचुकवेगिरी करणाऱ्यांना कडक इशाराच दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here