‘सुपीक जमिनी बळजबरीने घेऊ देणार नाही’; सरकारला गडचिरोली राष्ट्रवादीचा इशारा

1

‘सुपीक जमिनी बळजबरीने घेऊ देणार नाही’; सरकारला गडचिरोली राष्ट्रवादीचा इशारा
The गडविश्व
गडचिरोली, दि.०७ : जिल्ह्यात उद्योगांना राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध नसला, तरी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींचे बळजबरीने संपादन कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी पत्रकार परिषदेत दिला.

जिल्ह्यात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रियपणे सहभागी असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, आंदोलनावर राजकारण केल्याचा आरोप होऊ नये, म्हणून पक्षाने जाणीवपूर्वक पुढे येणे टाळल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनात सहभागी झालेल्या पक्षाच्या काही कार्यकर्त्यांवर कारवाईही होत असल्याचे त्यांनी सांगितले.

गण्यारपवार म्हणाले की, गडचिरोली येथे लवकरच शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार असून, या आंदोलनात कंपनीच्या दलालांना स्थान दिले जाणार नाही. शेतकरी वर्गाने अशा व्यक्तींना आंदोलनापासून दूर केल्याचा दावाही त्यांनी केला.

यापूर्वी गडचिरोली येथे झालेल्या शेतकरी आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी का झाली नाही, याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, त्या आंदोलनाचे पक्षाला निमंत्रण नव्हते. ते शेतकऱ्यांचे आंदोलन असल्याने त्यात हस्तक्षेप केला नाही. मात्र, नंतर काहींनी त्या आंदोलनावर वर्चस्व मिळविल्याचा आरोपही त्यांनी केला.

जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला पक्षाचा विरोध नसल्याचे स्पष्ट करताना गण्यारपवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींवर दरवर्षी दोन ते तीन पिके घेतली जातात आणि हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून आहे. गडचिरोली जिल्ह्यात सुमारे ७८ टक्के जंगल, १० टक्के महसूल जमीन आणि केवळ १२ टक्के शेतीक्षेत्र असल्याने उपलब्ध शेतीजमीन जपणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक ॲड. बोरकुटे, सरचिटणीस प्रवीण कुटे, महासचिव अविनाश गौतपत, प्रदेश सदस्य ॲड. संजय ठाकरे, विदर्भ प्रमुख शैलेश तिवारी, महिला जिल्हाध्यक्ष संगीता राऊत, शेमदेव चाफले, संजय शृंगारपवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here