प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक उधळली ; ९.७२ लाखांचा माल जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि.७ : गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक उधळून लावत ९ लाख ७२ हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन युवकांना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे.
महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखूच्या विक्री व वाहतुकीवर बंदी घातली असतानाही चामोर्शीकडे मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांना मिळाली होती. त्यानुसार ४ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महामार्ग ३५३-सीवरील पोहार नदी पुलाजवळ, कुरुड गावानजीक पोलिसांनी सापळा रचला.
यावेळी एमएच-३३ टी-५८९२ क्रमांकाचे बोलेरो मॅक्स पिकअप वाहन अडवून तपासणी केली असता, वाहनातून ‘होला हुक्का टोबॅको’चे १,८०० पॅकेट, ‘मजा’ सुगंधित तंबाखूचे ४०० डबे, ‘ईगल’ ब्रँडची तंबाखू तसेच ‘ईगल हुक्का शिसा’चे ४०० डबे असा मोठा साठा आढळून आला. तंबाखूचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा मिळून ९.७२ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या कारवाईत नंदकिशोर दिवरुजी शेट्टे (२१, रा. चामोर्शी) आणि राजेंद्र ईश्वर नैताम (२१, रा. मार्कड मोहल्ला, चामोर्शी) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत हा माल चंद्रकांत शत्रुघ्न पिपरे याच्या सांगण्यावरून आणला जात असल्याची माहिती समोर आली. तसेच जप्त वाहनही त्याच्याच मालकीचे असल्याचे निष्पन्न झाले.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तक्रारीवरून चामोर्शी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून फरार असलेल्या मुख्य संशयिताचा शोध सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मानकर करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा व गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.













