‘नाहरकत प्रमाणपत्रा’साठी ७ हजारांची लाच ; ग्रामसेविका एसीबीच्या जाळ्यात

20

‘नाहरकत प्रमाणपत्रा’साठी ७ हजारांची लाच ; ग्रामसेविका एसीबीच्या जाळ्यात
– पोल्ट्री फार्मच्या एनओसीसाठी पैशांची मागणी, लाखांदूर तहसील कार्यालयाबाहेर रंगेहात कारवाई
The गडविश्व
भंडारा, दि. ७ : पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्याच्या मोबदल्यात सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना मोहरणा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेला भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात अटक केली. गुरुवारी (६ ऑगस्ट) लाखांदूर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली. याप्रकरणी लाखांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या ग्रामसेविकेचे नाव रंजू मधुकर अंबादे (वय ४१, रा. दिघोरी मोठी) असे असून त्या मोहरणा ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
तक्रारदार हा आपल्या आईच्या नावे असलेल्या शेतजमिनीत पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. मात्र, प्रमाणपत्र तातडीने मंजूर करून देण्यासाठी सुरुवातीला १० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. नंतर तडजोडीअंती सात हजार रुपये देण्याची मागणी ग्रामसेविकेने केल्याचा आरोप आहे.
लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने भंडारा एसीबीकडे तक्रार दाखल केली. एसीबीने पडताळणी केली असता सात हजार रुपयांच्या लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाखांदूर तहसील कार्यालयाच्या गेटसमोर सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून सात हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने रंजू अंबादे यांना रंगेहात पकडले.
ही कारवाई भंडारा एसीबीचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर व विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक प्रविणकुमार पाटील यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक नितेश देशमुख व त्यांच्या पथकाने केली.
या कारवाईमुळे लाखांदूर तालुक्यात खळबळ उडाली असून, ग्रामपंचायत स्तरावरील भ्रष्टाचाराविरोधात एसीबीने पुन्हा एकदा कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here