गडचिरोलीच्या नावाने जुने व परराज्यातील फोटो व्हायरल; अफवांपासून सावध राहण्याचे प्रशासनाचे आवाहन
– तेलंगणातील आठ वर्षांपूर्वीचे छायाचित्र गडचिरोलीचे म्हणून प्रसारित; रस्त्यांच्या दुरुस्तीपूर्वीची जुनी छायाचित्रेही व्हायरल
The गडविश्व
गडचिरोली, दि. ७ : समाजमाध्यमांवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था व रस्त्यांच्या स्थितीबाबत जुनी तसेच अन्य राज्यांतील छायाचित्रे गडचिरोलीची असल्याचा दावा करत प्रसारित केली जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अशा दिशाभूल करणाऱ्या पोस्टमुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असल्याने कोणतीही माहिती अथवा छायाचित्र सत्यता पडताळल्याशिवाय शेअर करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
प्रशासनाने केलेल्या पडताळणीत सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले रुग्णाला झोळीतून दुर्गम भागातून नेत असल्याचे छायाचित्र गडचिरोलीचे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हे छायाचित्र तेलंगणा राज्यातील असून सुमारे आठ वर्षांपूर्वीचे आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने १९ जुलै २०१८ रोजी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून दुर्गम भागातील आरोग्यसेवेतील प्रयत्नांची दखल घेत हे छायाचित्र प्रसिद्ध केले होते. त्यामुळे ते गडचिरोलीतील सध्याच्या परिस्थितीशी जोडून प्रसारित करणे वस्तुस्थितीविरुद्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
याशिवाय जिल्ह्यातील काही रस्त्यांच्या दुरुस्तीपूर्वी काढण्यात आलेली जुनी छायाचित्रेही सध्याची परिस्थिती असल्याप्रमाणे सोशल मीडियावर पुन्हा प्रसारित केली जात आहेत. मात्र, संबंधित विभागांकडून अनेक ठिकाणी खड्डे बुजविणे, तात्पुरती दुरुस्ती आणि वाहतूक सुरळीत करण्याची कामे पूर्ण झाली असून काही ठिकाणी ती सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्ट, छायाचित्र किंवा व्हिडिओ सत्य आणि वर्तमान परिस्थितीशी संबंधित असेलच असे नाही. कोणतीही माहिती पुढे पाठविण्यापूर्वी तिचा स्रोत, दिनांक, ठिकाण आणि सत्यता पडताळणे आवश्यक आहे. प्रशासनाबाबत वस्तुनिष्ठ सूचना व तक्रारींचे स्वागत असले तरी अप्रमाणित आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणे टाळावे.
संशयास्पद पोस्ट, छायाचित्र किंवा व्हिडिओ आढळल्यास त्याची खातरजमा केल्याशिवाय तो पुढे पाठवू नये. तसेच अधिकृत माहितीसाठी शासन व जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत माध्यमांवरून प्रसिद्ध होणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













