निवृत्तीवेतनधारकांच्या सेवा आता ‘महा-उपलब्धी’ ॲपद्वारे मोबाईलवर
– निवृत्तीवेतनधारक मेळावा व ॲपविषयक कार्यशाळा उत्साहात
The गडविश्व
गडचिरोली, दि. ७ : राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना विविध निवृत्तीवेतनविषयक सेवा आता ‘महा-उपलब्धी’ या अधिकृत मोबाईल ॲपद्वारे सहज उपलब्ध होणार आहेत. या ॲपच्या वापराबाबत माहिती व प्रात्यक्षिक देण्यासाठी तसेच निवृत्तीवेतनधारकांच्या अडीअडचणी आणि शंकांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालय, गडचिरोली आणि जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, सामाजिक न्याय विभाग, गडचिरोली येथे दि. 6 ऑगस्ट रोजी कार्यशाळा व निवृत्तीवेतनधारक मेळावा आयोजित करण्यात आला.
मेळाव्यात जिल्हा कोषागार अधिकारी धर्मराव पेंदाम, अपर कोषागार अधिकारी दीपक उके, जिल्हा निवृत्तीवेतनधारक संघटनेचे अध्यक्ष वामन जुवारे, सचिव सुरेश मांडवगडे, पोलीस निवृत्तीवेतनधारक संघटनेचे अध्यक्ष मडावी, कोषाध्यक्ष मंडलवार, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रमुख प्रशांत धोंगडे, गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विशेष कार्यकारी अधिकारी आलमपटलावार, बँक ऑफ इंडियाचे काकपुरे यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारक उपस्थित होते.
कार्यक्रमात जिल्हा कोषागार कार्यालयाचे प्रवीण सोनवाणे यांनी ‘महा-उपलब्धी’ ॲपचे प्रोजेक्टरद्वारे थेट प्रात्यक्षिक सादर केले. ॲपमध्ये निवृत्तीवेतनधारकांना दरमहा निवृत्तीवेतन प्रदानाचा तपशील (पेमेंट हिस्ट्री), उत्पन्न प्रमाणपत्र, फॉर्म क्रमांक 16, ई-पीपीओ लायब्ररी तसेच निवृत्तीवेतनाशी संबंधित विविध शासन निर्णय व अन्य महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्हा कोषागार अधिकारी धर्मराव पेंदाम यांनी ‘महा-उपलब्धी’ ॲपमुळे निवृत्तीवेतनधारकांना आवश्यक सेवा मोबाईलवर उपलब्ध होत असल्याचे सांगून जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
अपर कोषागार अधिकारी दीपक उके यांनी उपस्थितांच्या निवृत्तीवेतनविषयक शंका व अडचणींचे निराकरण केले. मोबाईल ॲप वापरताना अडचण आल्यास जिल्हा कोषागार कार्यालयातील सुविधा केंद्रामार्फत आवश्यक मार्गदर्शन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी वयाची 85 वर्षे पूर्ण केलेले ज्येष्ठ निवृत्तीवेतनधारक मुरलीधर कोमाजी उईके, लक्ष्मण तानूजी चिचघरे आणि तुकाराम लटारू दुमाने यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हा निवृत्तीवेतनधारक संघटनेचे अध्यक्ष वामन जुवारे यांनी निवृत्तीवेतनधारकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. सचिव सुरेश मांडवगडे यांनी निवृत्तीवेतनधारकांच्या विविध समस्या संघटनेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपकोषागार अधिकारी नरेश लोंढे यांनी केले. जिल्हा अग्रणी बँकेचे प्रमुख प्रशांत धोंगडे आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी आलमपटलावार यांनी निवृत्तीवेतनधारकांसाठी बँकांमार्फत उपलब्ध विविध सुविधांची माहिती दिली. बँक ऑफ इंडियाचे काकपुरे यांनी सायबर सुरक्षा व आर्थिक व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले. आरबीआय सीएफएलचे केंद्र समन्वयक सुरज खोब्रागडे यांनी वित्तीय साक्षरता आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी उपलब्ध विमा संरक्षण योजनांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन प्रवीण सोनवाणे यांनी केले, तर उपलेखापाल भास्कर निबेंकर यांनी आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी माया मामीडवार, मयुरी दंडेवार, ठाकरे, हिवरकर, किरंगे, महादेव निकुरे, संजय जोशी, कवडुजी येरमे आदींनी सहकार्य केले.













