गोंदिया : अस्वलाचा जीवघेणा हल्ला, कर्तव्यावर असलेल्या वनरक्षकाचा मृत्यू

20

गोंदिया : अस्वलाचा जीवघेणा हल्ला, कर्तव्यावर असलेल्या वनरक्षकाचा मृत्यू
The गडविश्व
गोंदिया, दि. ६ : नवेगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील उमरझरी वनपरिक्षेत्रात कर्तव्य बजावत असलेल्या वनरक्षकाचा अस्वलाच्या अचानक झालेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि. ५) दुपारी सुमारे ४ वाजता घडली. शामू शरणागत (वय ४२, रा. पारसनगरी, तिरोडा) असे मृत वनरक्षकाचे नाव असून, त्यांच्या निधनाने वनविभागात हळहळ व्यक्त होत आहे.
माहितीनुसार, रिसाडा बिट परिसरातील उमरझरी गेटवर नियमित कर्तव्य बजावत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या अस्वलाने शामू शरणागत यांच्यावर अचानक हल्ला चढविला. त्यांनी अस्वलाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला. शरणागत यांच्या कुटुंबीयांना वनविभागाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, शामू शरणागत यांनी यापूर्वी भारतीय सैन्यदलात सेवा बजावली होती. सैन्य सेवेतील कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांनी वन विभागात वनरक्षक म्हणून रुजू होत वन्यजीव संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र कर्तव्य बजावत असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.
दरम्यान, नागझिरा परिसरात वनकर्मचाऱ्यांवर अस्वलाच्या हल्ल्यांची ही पहिली घटना नाही. यापूर्वीही बफर क्षेत्रात गस्तीदरम्यान दोन वनमजूर अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. त्यानंतरही कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले नसल्याची नाराजी वनकर्मचाऱ्यांमध्ये आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे अनेकदा वनरक्षकांना एकट्याने किंवा केवळ एका वनमजुरासह दुर्गम जंगलात गस्त घालावी लागत असल्याने या घटनेनंतर वनकर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here