The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ११ : तालुक्यातील चातगाव येथे ८ मार्च २०२५ रोजी पोलीस मदत केंद्र आणि ग्रामपंचायत चातगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती लता माधव उईके होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक अक्षय जाधव आणि ग्रामपंचायत अधिकारी रणजीत राठोड उपस्थित होते. महिला ग्रामसभा आयोजित करून महिलांच्या हक्क आणि सशक्तीकरणावर चर्चा करण्यात आली.
महिला दिनाचे औचित्य साधून गावातील महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामसंघाच्या अध्यक्ष व सचिवांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

“महिला सक्षम होत आहेत” – पोलीस उपनिरीक्षक अक्षय जाधव
यावेळी बोलताना पोलीस उपनिरीक्षक अक्षय जाधव यांनी महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करताना सांगितले की, आज महिला विविध क्षेत्रात आपली चमक दाखवत आहेत. त्यांनी पुरुषांवर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
ग्रामपंचायत अधिकारी रणजीत राठोड यांनीही महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे येऊन समाजात आपले स्थान भक्कम करावे, असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला चातगाव पोलीस मदत केंद्र व ग्रामपंचायतीचे कर्मचारी तसेच गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.