– निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य ग्राहकांच्या माथी, रुपेश वलके यांचा आरोप
The गडविश्व
गडचिरोली, दि. १२ : राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत स्वस्त धान्य दुकानातून वितरित केला जाणारा गहू आणि तांदूळ अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्याच्या तक्रारी सर्वत्र वाढत आहेत. अनेक लाभार्थ्यांनी आक्षेप नोंदवला आहे, धान्य खराब, कुजलेले, किडलेले आणि काही वेळा तर पशुखाद्यालाही योग्य नसलेले असते. अतिशय निकृष्ट दर्जाचा गहू तांदूळ मोफत मध्ये तरी कसा खाऊ ? असा नागरिक प्रश्न विचारत असून निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य ग्राहकांच्या माथी मारला जात आहे असा आरोपही सामाजिक कार्यकर्ते रुपेश वलके यांनी केला आहे.
नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्यावर मोठ्या प्रमाणात सबसिडी दिली जात असतांनाही निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य पुरवठा केला जात असल्याचे आढळून आले आहे. मोफत धान्य मिळते म्हणून लोक गप्प बसावे का? गरिबीचा फायदा घेत त्यांना अशा निकृष्ट अन्नधान्याच्या माध्यमातून वागवले जात आहे का? सरकारी गोदामांमध्ये चांगले धान्य सडत असताना गरीबांना मात्र उरलेसुरले धान्य वाटले जात आहे, हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. मोफत धान्य ही सरकारने केलेली एक लोकानुभूल योजना असली तरी त्याची अंमलबजावणी अपयशी ठरत आहे. प्रश्न असा आहे की, सरकारकडून खरेदी केलेले चांगले धान्य अखेर निकृष्ट दर्जाचे कसे होते? त्यामध्ये भ्रष्टाचाराचा मोठा भाग असावा, अशी शक्यता वर्तवली जात असून चांगल्या धान्याची तस्करी करून खराब धान्य जनतेच्या वाट्याला येत आहे. गरीबांना चांगले धान्य द्यायचे की त्यांचे आरोग्य धोक्यात घालायचे, हा प्रश्न सरकारने गांभीर्याने घ्यावा. अन्यथा ही योजना लोकांसाठी लाभदायक ठरण्याऐवजी त्रासदायकच ठरेल.
दरम्यान हा सर्व प्रकार बघता यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेचे दिसून येत असून असा निकृष्ट दर्जाचा गहू, तांदूळ वरील स्तरावरून पास तरी कसा होता असा आरोपही सामाजिक कार्यकर्ते रुपेश वलके यांनी केला असून याची चौकशी करण्यात यावी अशीही मागणी त्यांनी केली आहे. अतिशय निकृष्ट दर्जाचा गहू तांदूळ मोफत देण्यात येत असला तरी तो मोफत मध्ये तरी कसा खाऊ असा सवालही नागरिक करीत आहे. मोफत म्हणून काहीही देणे आणि गरीबांना निकृष्ट धान्य गिळण्यास भाग पाडणे हा अन्यायच आहे. आरोग्याशी तडजोड करून पोट भरण्याची वेळ येणे, हे कोणत्याही सभ्य समाजासाठी लाजिरवाणे आहे. सरकारने याची गंभीर दखल घेऊन तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करीत आहे.
