भाजप-काँग्रेसने शेतकऱ्यांचा सत्यानाश केला; रामदास जराते यांची टीका
– दोन लाख एकर जंगल व शेतजमिनींच्या भूसंपादनाचा धोका; जिल्हाभर आंदोलन उभारण्याचा शेकापचा निर्धार
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०५ : जिल्ह्यातील लोहखाणी आणि प्रस्तावित प्रक्रिया उद्योगांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर जंगल व शेतजमिनींचे भूसंपादन केले जात आहे. या धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी शेतकऱ्यांचा सत्यानाश केला आहे, अशी टीका शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी केली. आगामी काळात सुमारे दोन लाख एकर जंगल व शेतजमिनी भूसंपादनाच्या विळख्यात येण्याची शक्यता असून, हा धोका रोखण्यासाठी जिल्हाभर आंदोलन उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आयोजित जिल्हा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. काँग्रेसच्या सत्ताकाळात कायद्यांना बगल देऊन जिल्ह्यात लोहखाणी मंजूर करण्यात आल्या. नक्षलवादाच्या नावाखाली स्थानिकांचा विरोध दडपून पोलीस बळाच्या जोरावर खाणी सुरू करण्यात आल्या. आता भाजप सरकारकडून खाणींसोबतच प्रक्रिया उद्योग उभारण्याचे प्रयत्न सुरू असल्याने शेतकऱ्यांना आपल्या जमिनी कवडीमोल भावाने गमावण्याची वेळ येत असल्याचा आरोप जराते यांनी केला.
जिल्ह्यात उद्योगांच्या नावाखाली जमिनी संपादित करणारे आणि त्याचवेळी विरोधाचे नाटक करणारेही तेच असल्याची टीका त्यांनी केली. शेतकरी व आदिवासींनी भावनिक न होता जमीन संपादनाच्या प्रक्रियेबाबत सजग राहावे. जमिनी वाचविण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी आणि आदिवासींना लाल झेंड्याखाली एकत्र आणून शासनाच्या धोरणांविरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जयश्रीताई वेळदा, युवक नेते अक्षय कोसनकर, जिल्हा समितीचे पदाधिकारी रमेश चौखुंडे, पांडुरंग गव्हारे, अशोक किरंगे, महागू पिपरे, दामोदर रोहणकर, डंबाजी भोयर, प्रभाकर गव्हारे, पवित्र दास, राजू केळझरकर, चिरंजीव पेंदाम, उमाकांत मुनघाटे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.













