राष्ट्रीय एकता परेडमध्ये गडचिरोलीच्या सी-60 जवानांचा डंका

1

राष्ट्रीय एकता परेडमध्ये गडचिरोलीच्या सी-60 जवानांचा डंका
– गुजरातमध्ये शिस्तबद्ध संचलन; परतलेल्या २०० जवानांचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरव
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०५ : राष्ट्रीय एकात्मता आणि देशाच्या एकता-अखंडतेचा संदेश देणाऱ्या गुजरातमधील राष्ट्रीय एकता परेडमध्ये गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या सी-६० पथकाने आपल्या शिस्तबद्ध संचलनाने जिल्ह्याचा नावलौकिक उंचावला. ३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकतानगर (केवडिया), गुजरात येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरात आयोजित या भव्य परेडमध्ये सी-६० पथकातील २०० जवानांनी सहभाग नोंदविला. या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होऊन गडचिरोलीत परतलेल्या जवान व अधिकाऱ्यांचा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या हस्ते गौरव करून अभिनंदन करण्यात आले.

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देशभर पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या परेडसाठी गडचिरोली पोलीस दलाचे पथक गेल्या दीड महिन्यापासून केवडिया येथे सराव करीत होते. कठोर प्रशिक्षण, शिस्त आणि समर्पित वृत्तीच्या जोरावर सी-६० जवानांनी राष्ट्रीय स्तरावरील या सोहळ्यात उत्कृष्ट संचलन सादर करीत गडचिरोली जिल्ह्याचे प्रभावी प्रतिनिधित्व केले. जिल्हा पोलीस दलासाठी ही निश्चितच अभिमानाची आणि सन्मानाची बाब ठरली आहे.

एकेकाळी माओवादाच्या गंभीर आव्हानाला सामोरे जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात आज शांतता, सुरक्षितता आणि विकासाला चालना मिळत आहे. जिल्हा पोलीस दलाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांसह सी-६० कमांडोंनी माओवादविरोधी अभियानात बजावलेली शौर्यपूर्ण कामगिरी यामध्ये महत्त्वपूर्ण ठरली आहे. जिल्ह्यातील २१४ जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले असून, असंख्य जवानांनी प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावत जिल्ह्याला माओवादाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. अशा शौर्यशाली दलाने राष्ट्रीय एकता परेडमध्ये सहभाग नोंदविणे हा गडचिरोलीच्या पोलीस दलासाठी विशेष गौरवाचा क्षण ठरला.

यावेळी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी परेडमध्ये सहभागी झालेल्या सर्व २०० अधिकारी व जवानांचे अभिनंदन केले. राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण कार्यक्रमात गडचिरोली जिल्हा पोलीस दलाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हा संपूर्ण दलासाठी सन्मानाचा क्षण असल्याचे त्यांनी नमूद केले. जवानांनी आपल्या उत्कृष्ट संचलनातून जिल्ह्याचे नाव उंचावल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, परेडमध्ये सहभागी झालेल्या अधिकारी व जवानांनी आपले अनुभव कथन करताना या उपक्रमामुळे राष्ट्रीय एकात्मतेची भावना, संघभावना आणि देशप्रेम अधिक दृढ झाल्याचे सांगितले. तसेच सराव आणि कार्यक्रमादरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या मार्गदर्शन व सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

या गौरव सोहळ्याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी, सहायक पोलीस अधीक्षक, भामरागड सागर भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जिमलगट्टा राहुल मडावी तसेच सहायक समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १८, काटोल, नागपूर येथील मंगेश शेलोटकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here