दारूबंदीसाठी दुधमाळा गावातील महिलांनी काढली रॅली

71
-चातगाव पोलिस मदत केंद्राला निवेदन सादर
The गडविश्व
गडचिरोली, ४ डिसेंबर  : धानोरा तालुक्यातील दूधमाळा गावात सुरू असलेल्या अवैध दारूविक्री विरोधात महिलांनी रॅली काढून नारेबाजी केली. सोबतच गाव संघटनेच्या शिष्टमंडळाने चातगाव पोलिस मदत केंद्राचे अधिकारी एपीआय पाटील यांना निवेदन सादर करून दारूविक्री बंद करण्याची मागणी केली.
चातगाव पोलिस मदत केंद्राअंतर्गत येणारे दूधमाळा गाव दारूविक्री मुक्त करण्यासाठी गाव संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे. मात्र, मूजोर विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला आहे. त्यामुळे गावातील महिलांनी सभा घेऊन अवैध दारूविक्री विरोधात रॅली व पोलिस विभागाला निवेदन देण्याचे ठरविले. त्याअनुषंगाने गावातून रॅली काढून ‘एक दो, एक दो दारूची बाटली फेक दो,’ ‘दारूबंदी झालीच पाहिजे’ अशी नारेबाजी केली. त्यांनतर गाव संघटनेच्या शिष्टमंडळाने चातगाव पोलिस मदत केंद्राला निवेदन सादर करून मूजोर दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. सोबतच दारूविक्रीमुळे गावाचे होणारे नुकसान, युवकांमध्ये वाढते दारूच्या व्यसनाचे प्रमाण, महिलांचा त्रास आदी समस्या महिलांनी पोलिस अधिकाऱ्यांपुढे मांडल्या.
यावेळी एपीआय पाटील यांनी दारूविक्रीमुक्त गाव निर्माण करण्यासाठी पोलिस विभाग सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. निवेदन देतांना गाव संघटनेच्या महिलांसह मुक्तीपथचे उपसंचालक संतोष सावळकर, पोलिस पाटील माधुरी उईके, तालुका संघटक अक्षय पेद्दीवार, प्रेरक भाष्कर कड्यामी, राहुल महाकुलकर आदी उपस्थित होते.
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Serch Chatgao)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here