‘नळातून पाणी की आजार?’ – कुरखेड्यात दूषित पाणीपुरवठ्यावर नागरिकांचा संताप
– स्वच्छ पाण्यासाठी नगर पंचायतला अंतिम इशारा
The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा, दि. ०८ : कुरखेडा शहरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून होत असलेल्या गढूळ, दूषित आणि अस्वच्छ पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाने अखेर जनआक्रोशाचे रूप धारण केले आहे. “स्वच्छ पिण्याचे पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे, उपकार नाही,” अशी ठाम भूमिका घेत शहरातील नागरिकांनी नगर पंचायत प्रशासनाला सविस्तर निवेदन देत तात्काळ कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र लोकशाही आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
मुख्याधिकारी व नगराध्यक्ष, नगर पंचायत कुरखेडा यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनेक वर्षांपासून शहरातील नागरिकांना नळाद्वारे गढूळ व दूषित पाणीपुरवठा केला जात असून, वारंवार तक्रारी करूनही या गंभीर समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करण्यात आलेले नाही. नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दूषित पाण्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याचा धोका वाढला आहे. भविष्यात जलजन्य आजारांची साथ किंवा अन्य गंभीर आरोग्यविषयक परिस्थिती उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी नगर पंचायत प्रशासनाची राहील, असा स्पष्ट इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनाद्वारे शहरातील संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणेची तातडीने तांत्रिक तपासणी, पाणी टाकीवर आधुनिक वॉटर प्युरिफिकेशन सिस्टीम व प्रभावी क्लोरीनेशन व्यवस्था बसविणे, प्रत्येक घरापर्यंत नियमित स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी पोहोचविणे, पाण्याची नियमित प्रयोगशाळा तपासणी करून त्याचा अहवाल सार्वजनिक करणे तसेच या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांनी स्पष्ट केले आहे की, या निवेदनानंतरही प्रशासनाने तात्काळ ठोस निर्णय न घेतल्यास शहरातील नागरिकांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन, उपोषण, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, सार्वजनिक आरोग्य विभाग व महाराष्ट्र शासनाकडे तक्रार तसेच न्यायालयीन लढा उभारण्यात येईल. त्यातून निर्माण होणाऱ्या सर्व परिस्थितीची जबाबदारी नगर पंचायत प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
हे निवेदन ईश्वर ठाकूर, अनाकुरे, दीपक धारगाये, हेमंत नरोटे, चेतन मैद, शहेजाद हाशमी, एजाज शेख, भावेश मुंगणकर आणि गोलू चांदेवार यांनी कुरखेडा शहरातील नागरिकांच्या वतीने सादर केले.
कुरखेडा शहरातील स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता केवळ नागरिकांची तक्रार राहिलेली नसून, तो सार्वजनिक आरोग्याशी निगडित गंभीर विषय बनला आहे. त्यामुळे नगर पंचायत प्रशासन या प्रश्नावर किती तातडीने आणि प्रभावीपणे निर्णय घेते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.













