अवैध दारू विक्रेत्यावर मोठी कारवाई; सराईत गुन्हेगाराला सहा महिन्यांसाठी गडचिरोलीतून हद्दपार
– अवैध धंदे व गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात पोलिसांचा कडक इशारा
The गडविश्व
गडचिरोली, दि. ७ : जिल्ह्यातील अवैध दारू व्यवसाय आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर लगाम घालण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी कठोर पाऊल उचलले असून, कोरची पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत अवैध दारू विक्रेत्याला सहा महिन्यांसाठी गडचिरोली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, कुरखेडा यांनी हा आदेश पारित केला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू असतानाही काही जणांकडून छुप्या पद्धतीने अवैध दारूची विक्री व वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा बेकायदेशीर व्यवसायांवर प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी दिले होते. त्यानुसार कोरची पोलिसांनी आवश्यक प्रस्ताव सादर केल्यानंतर ३ जुलै २०२६ रोजी हद्दपारीचा आदेश जारी करण्यात आला.
हद्दपार करण्यात आलेला आरोपी तिलक बाबुलाल उंदीरवाडे (रा. खुर्शीपार, ता. कोरची) याच्याविरुद्ध अवैध दारू विक्री, कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणे तसेच इतर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. सन २००९ ते २०२५ या कालावधीत त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५ सह विविध कलमांन्वये एकूण १२ गुन्हे दाखल आहेत.
वारंवार गुन्हे दाखल होऊनही आरोपीच्या वर्तनात कोणताही बदल न झाल्याने कोरची पोलिसांनी त्याच्याविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, कुरखेडा यांच्याकडे सादर केला होता. चौकशीनंतर संबंधित व्यक्तीच्या हालचाली समाजातील नागरिकांच्या जीवित व मालमत्तेस धोका निर्माण करणाऱ्या असल्याचे स्पष्ट झाल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ५६(१)(अ) अन्वये त्याला सहा महिन्यांसाठी गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले.
पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, संबंधित आरोपीने हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्याला तातडीने अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातील अवैध व्यवसाय, सराईत गुन्हेगार आणि कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या प्रवृत्तींविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सांगितले. सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई, तडीपार आणि इतर कठोर उपाययोजना सातत्याने सुरू राहतील, असा इशाराही त्यांनी दिला.













