आदिवासी भागातील बांबू क्रांतीला राज्याची सलामी : गडचिरोलीच्या सहकारी संस्थेला ‘सहकार ग्रामविकास पुरस्कार’
– रोजगार, शेतकरी सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास मॉडेलचा गौरव
The गडविश्व
मुंबई / गडचिरोली, दि. ०७ : गडचिरोलीच्या दुर्गम आदिवासी भागात बांबू उद्योगाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, शेतकरी सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाचे यशस्वी सहकार मॉडेल उभे करणाऱ्या गडचिरोली जिल्हा आदिवासी बांबू प्रक्रिया सहकारी संस्थेला यंदाचा प्रतिष्ठेचा ‘सहकार ग्रामविकास पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे गडचिरोलीच्या बांबू उद्योगाला राज्यस्तरावर नवी ओळख मिळाली असून, आदिवासी भागातील सहकारावर आधारित विकास मॉडेलची राज्यभर दखल घेण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी संघ व सहकारी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, विनय कोरे, मंगलप्रसाद लोढा, उदय सामंत, प्रसाद लाड यांच्यासह सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
गडचिरोलीसारख्या दुर्गम आदिवासी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बांबू उत्पादनाला योग्य दर मिळावा आणि स्थानिक युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने डॉ. नामदेव उसेंडी यांच्या पुढाकारातून सहकारी तत्त्वावर या संस्थेची स्थापना करण्यात आली. आज संस्थेशी सुमारे ८७० सभासद जोडले गेले असून, बांबू उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याचे काम संस्थेमार्फत सातत्याने सुरू आहे.
संस्थेने जिल्ह्यातील नैसर्गिक बांबू संसाधनाचा प्रभावी वापर करत बांबू फ्लोअरिंग टाइल्स, फर्निचर तसेच विविध मूल्यवर्धित बांबू उत्पादनांचा आधुनिक उद्योग प्रकल्प उभारला आहे. सहकारी साखर कारखान्यांच्या धर्तीवर शेतकऱ्यांकडून बांबू खरेदी करून त्यावर प्रक्रिया करत मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याचा हा राज्यातील पहिलाच सहकारी प्रयोग मानला जात आहे. ग्रामीण औद्योगिकीकरण आणि स्थानिक संसाधनांच्या मूल्यवर्धनासाठी हे मॉडेल आदर्श ठरत असल्याची दखलही यानिमित्ताने घेण्यात आली.
दुर्गम आदिवासी भागातील रोजगारनिर्मिती, स्थानिक संसाधनांचे मूल्यवर्धन, शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठीचे प्रयत्न आणि सहकार चळवळीला आधुनिक दिशा देणाऱ्या या अभिनव उपक्रमाचा ‘सहकार ग्रामविकास पुरस्कार’ाने गौरव करण्यात आला. या सन्मानामुळे गडचिरोलीच्या बांबू उद्योगाला नवी उभारी मिळणार असून, राज्यातील इतर ग्रामीण भागांसाठीही हे सहकार मॉडेल प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.













