गडचिरोली : शिष्यवृत्ती योजनेत मोठा गैरव्यवहार, बनावट विद्यार्थ्यांच्या नावाने शासनाची लाखोंची फसवणूक

113

गडचिरोली : शिष्यवृत्ती योजनेत मोठा गैरव्यवहार, बनावट विद्यार्थ्यांच्या नावाने शासनाची लाखोंची फसवणूक
– शासकीय आयटीआय, चामोर्शीच्या UDISE कोडचा गैरवापर, चामोर्शी पोलिसांत गुन्हा
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०७ : केंद्र शासन पुरस्कृत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेत मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), चामोर्शीच्या UDISE कोडचा गैरवापर करून २२ बनावट विद्यार्थ्यांच्या नावाने २ लाख ९३ हजार ४०० रुपयांची शिष्यवृत्ती उचलून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चामोर्शी पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहसंचालक, उच्च शिक्षण, नागपूर विभाग कार्यालयातील प्रशासन अधिकारी शंकर रामजी बर्गे यांनी शासनाच्या वतीने दिलेल्या फिर्यादीवरून चामोर्शी पोलीस ठाण्यात आदित्य मेंहदळे व रागार कलवी निलयम यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता/भारतीय दंड संहितेतील फसवणूक व बनावट कागदपत्रांशी संबंधित कलमे तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६(ड) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सन २०२१-२२ आणि २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांतील संशयास्पद शिष्यवृत्ती अर्जांची पडताळणी करण्यात आली. त्याअंतर्गत २३ एप्रिल २०२५ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), चामोर्शी येथे प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवरील नोंदींमध्ये २२ विद्यार्थ्यांच्या नावाने शिष्यवृत्ती मंजूर झाल्याचे दिसून आले. मात्र, संस्थेच्या प्रवेश नोंदवहीची तपासणी केली असता हे विद्यार्थी संबंधित शैक्षणिक वर्षात संस्थेत प्रवेशितच नसल्याचे स्पष्ट झाले.
तपासादरम्यान संस्थेच्या अधिकृत UDISE कोडचा गैरवापर करून मूळ हेड ऑफ इन्स्टिट्यूट (HOI) आणि इन्स्टिट्यूट नोडल ऑफिसर (INO) यांची माहिती बदलण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बनावट पदे धारण करून २२ विद्यार्थ्यांच्या नावाने शिष्यवृत्तीचे अर्ज भरून शासनाकडून २.९३ लाखांची रक्कम प्राप्त करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
शिक्षण संचालनालय, पुणे तसेच सहसंचालक, उच्च शिक्षण, नागपूर विभाग यांच्या आदेशानंतर ६ जुलै २०२६ रोजी शासनाच्या वतीने अधिकृत फिर्याद दाखल करण्यात आली. चामोर्शी पोलिसांनी गुन्हा नोंदवून संपूर्ण आर्थिक व्यवहार, शिष्यवृत्तीची रक्कम जमा झालेली बँक खाती, नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवरील तांत्रिक नोंदी आणि या गैरव्यवहारात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीतील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई, शिष्यवृत्तीची रक्कम वसूल करणे तसेच संबंधित संस्थेचा AISHE व UDISE कोड रद्द करण्याची प्रक्रिया शासनाकडून राबविण्यात येणार आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here