– कोट्यवधींचा खर्च, पण दारांवर कायम कुलूप
The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. ०९ : धानोरा तालुक्यातील रांगी आणि आरमोरी तालुक्यातील कोरेगाव येथे शासनाने लाखो रुपये खर्च करून जनावरांच्या उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखाने उभारले, परंतु या दोन्ही ठिकाणी दवाखाने आजही ‘रामभरोसे’ असल्याचे चित्र समोर आले आहे. दवाखान्यांची इमारत, निवासस्थान, सिमेंट रस्ते, विहीर, नाले, पाण्याची टाकी आणि इलेक्ट्रिक फिटिंग अशी सर्व सोयीसुविधा असूनही येथे कोणीही कर्मचारी मुख्यालयी वास्तव्य करत नाही. परिणामी, परिसरातील पशुपालकांना उपचाराऐवजी बंद दवाखाना आणि कुलूपबंद दारच दिसते.
रांगीसह निमगाव, बोरी, मासरगाटा, निमनवाडा आणि शिवगाटा या गावांतील शेतकरी आपली जनावरे घेऊन उपचारासाठी दवाखान्यात येतात, पण तेथे डॉक्टर नाही, पशुधन पर्यवेक्षक नाही आणि शिपाईचाही पत्ता लागत नाही. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली इमारत धूळ खात आहे. मागील दहा वर्षांपासून या इमारतींची दुरवस्था झाली असून आता त्यांची अवस्था दयनीय बनली आहे. परिसरात लंपी आणि चौखुराच्या साथीचे आजार वाढत असताना शासनाच्या या निष्क्रियतेमुळे शेतकऱ्यांना खाजगी उपचारांचा आधार घ्यावा लागत आहे. “दवाखाना आहे पण डॉक्टर नाही, हा आमच्यासाठी विनोदच आहे का?” असा संतप्त प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.
या संदर्भात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मीनल सोनटक्के यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, “आम्ही सतत गावोगावी लसीकरणासाठी फिरत असतो. कोरेगावचा प्रभार आमच्याकडे असून शिपाई नसल्याने दवाखाना नेहमी उघडा ठेवणे शक्य होत नाही.” मात्र कोरेगावचे पोलिस पाटील ओमप्रकाश मडावी यांनी सांगितले की, “लंपी रोगाची आणि चौखुराची साथ असतानाही गावात लसीकरण झालेले नाही. त्यामुळे पशुपालकांना खाजगी उपचार करावे लागत आहेत.”
दरम्यान, रांगी आणि कोरेगाव परिसरातील शेतकरी व पशुपालकांनी शासनाकडे दवाखान्यांची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांचे जनावरे आजाराने दगावत असताना दवाखान्यांच्या दारांवरील कुलूपे मात्र अबाधित आहेत. कोट्यवधींचा खर्च होऊनही उपचार बंद असलेले हे दवाखाने शासनाच्या ग्रामीण आरोग्य व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














