गडचिरोलीत 13 पिलांसह डुरक्या घोणसाचे थरारक रेस्क्यू
– सर्पमित्रांकडून जंगलात सुरक्षित मुक्तता
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३१ : नवेगाव परिसरात एका घराजवळ तब्बल 13 पिलांसह डुरक्या घोणस (मातिखाया) जातीच्या सापाचे यशस्वी रेस्क्यू करण्यात सर्पमित्रांना यश आले. सर्पमित्रांच्या या धाडसी आणि कौशल्यपूर्ण कार्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
नवेगाव येथील रहिवासी दिलीप आचारी यांच्या घर परिसरात सुमारे वर्षभरापासून एका सापाचा वावर असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले होते. घराजवळ वारंवार साप दिसत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबतची माहिती मिळताच सर्पमित्र अजय कुकडकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.
संबंधित ठिकाणाची बारकाईने पाहणी केल्यानंतर सुरक्षित ठिकाणी डुरक्या घोणस अर्थात मातिखाया जातीचा प्रौढ साप आढळून आला. विशेष म्हणजे, पुढील शोधमोहीमेदरम्यान त्याच परिसरात सापाची तब्बल 13 पिलेही आढळून आली. एवढ्या मोठ्या संख्येने पिले सापडल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
सर्पमित्रांनी अत्यंत दक्षता, संयम आणि कौशल्य दाखवत प्रौढ सापासह सर्व पिलांचे सुरक्षित रेस्क्यू केले. या संपूर्ण मोहिमेदरम्यान कोणत्याही प्रकारची जीवितहानी अथवा इजा होऊ नये याची विशेष काळजी घेण्यात आली. त्यानंतर साप व त्याची सर्व पिले त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आली.
यावेळी सर्पमित्र अजय कुकडकर यांनी नागरिकांना साप दिसल्यास घाबरून न जाता किंवा त्याला मारण्याचा प्रयत्न न करता तात्काळ प्रशिक्षित सर्पमित्र अथवा वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. साप हे पर्यावरणीय साखळीतील महत्त्वाचे घटक असून उंदीर व इतर कीटकांचे नियंत्रण करून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करतात. त्यामुळे सापांचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
या बचाव मोहिमेत अजय कुकडकर यांच्यासह विशाल आचारी, सौरभ सातपुते, योगेश हजारे, अनुप म्हशाखेत्री आणि अनिकेत उरकडे यांनी मोलाचे सहकार्य केले. सर्पमित्रांच्या या कार्याचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














