रांगीत जिल्हाधिकाऱ्यांचा ऐतिहासिक ‘गाव मुक्काम’; गावकऱ्यांशी थेट संवाद साधत समस्यांवर तात्काळ निर्णय

30

रांगीत जिल्हाधिकाऱ्यांचा ऐतिहासिक ‘गाव मुक्काम’; गावकऱ्यांशी थेट संवाद साधत समस्यांवर तात्काळ निर्णय
– विशेष सर्वेक्षण व संतृप्ती मोहिमेंतर्गत महत्त्वपूर्ण बैठक; प्रशासन थेट गावाच्या दारी
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ३१ : देशव्यापी विशेष सर्वेक्षण व सेवा संतृप्ती मोहिमेंतर्गत धानोरा तालुक्यातील रांगी येथे ग्रामपंचायत कार्यालयात महत्त्वपूर्ण शासकीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. गावातील शेवटच्या पात्र लाभार्थ्यापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविणे आणि कोणताही नागरिक योजनांपासून वंचित राहू नये, या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली.
या बैठकीचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे तसेच जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी रांगी गावात प्रत्यक्ष भेट देऊन रात्रीचा मुक्काम केला. जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकारी गावात मुक्कामी राहून ग्रामस्थांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याची घटना तालुक्यासाठी ऐतिहासिक ठरली आहे. या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले.
बैठकीस तहसीलदार गणेश माळी, गट विकास अधिकारी रोशन दुबे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत साळवे, मंडळ अधिकारी वैशाली डोंगरे, गट शिक्षणाधिकारी हेमलता परसो यांच्यासह महसूल, कृषी, वन विभाग, बँकिंग क्षेत्र व ग्रामपंचायत प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी कृषी, शिक्षण, महसूल व मूलभूत सुविधांशी संबंधित विविध समस्या आणि मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. नागरिकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना समस्यांच्या तात्काळ निराकरणासाठी जागेवरूनच आवश्यक सूचना देण्यात आल्या.
रात्रीचा मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावात सुरू असलेल्या विशेष सर्वेक्षण व संतृप्ती मोहिमेच्या कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. सर्वेक्षणाचे काम निर्धारित कालावधीत पूर्ण करून शासकीय योजनांचा शंभर टक्के लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.
या बैठकीस महसूल कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी, अंगणवाडी सेविका, लोकप्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कृषी अधिकारी आर. एम. मेश्राम यांनी केले, तर आभार तहसीलदार गणेश माळी यांनी मानले.
विशेष सर्वेक्षण व संतृप्ती मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here