पहिल्याच प्रयत्नात यशाची कमाल : गेवर्धाच्या युवकांची पोलीस भरतीत निवड

30

पहिल्याच प्रयत्नात यशाची कमाल : गेवर्धाच्या युवकांची पोलीस भरतीत निवड
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. १० : जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनतीच्या जोरावर स्वप्ने कशी साकार होऊ शकतात, याचे प्रेरणादायी उदाहरण गेवर्धा येथील दोन युवकांनी घालून दिले आहे. सुमेध खुशाल रामटेके आणि प्रवीण पैकू कुलसेंगे या युवकांनी पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र पोलीस भरतीत यश मिळवत पोलीस दलात आपली निवड निश्चित केली आहे.
साधारण कुटुंबातून पुढे आलेल्या सुमेध रामटेके यांचे वडील तहसील कार्यालयाबाहेर अर्जनवीस म्हणून काम करतात. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाची वाट सोडली नाही. सुमेध यांचे प्राथमिक शिक्षण गेवर्धा येथील जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण श्रीराम महाविद्यालय, कुरखेडा येथे पूर्ण झाले.
प्रवीण कुलसेंगे यांची कहाणीही संघर्षमय आहे. लहान वयातच वडिलांचे छत्र हरवल्यानंतर त्यांच्या आईने मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. अशा परिस्थितीत प्रवीण यांनी जिद्दीने शिक्षण घेतले. त्यांचे प्राथमिक शिक्षण गेवर्धा येथे, तर माध्यमिक शिक्षण आदर्श महाविद्यालय, वडसा येथे पूर्ण झाले.
पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या या दोघांनी उच्च माध्यमिक शिक्षणानंतर पोलीस भरतीची तयारी सुरू केली. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी अभ्यास आणि मैदानावरील सराव यामध्ये सातत्य ठेवले. गडचिरोली येथे अभ्यासिका व मैदानी सराव करत त्यांनी आपली तयारी अधिक भक्कम केली.
नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत त्यांनी सहभाग घेतला होता. शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेनंतर ८ एप्रिल २०२६ रोजी जाहीर झालेल्या अंतिम निकालात दोघांचेही नाव झळकले आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी यश संपादन केले.
सुमेध रामटेके यांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान व इतर सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या या यशाबद्दल संकल्प फाउंडेशन या समाजसेवी संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खुशाल रामटेके, डॉ. जगदीश बोरकर, लोकेश ठाकरे, जितेंद्र वटी, अतुल अंबादे, फलिंद्र मांडवे, राहुल पाटणकर, वेद बोरकर, चंद्रकला रामटेके, बाळाजी नखाते आदी मान्यवर उपस्थित होते.
सुमेध व प्रवीण यांच्या यशामुळे गेवर्धा परिसरात आनंदाचे वातावरण असून, गावकऱ्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आपल्या यशाचे श्रेय दोघांनीही आई-वडील आणि मित्रपरिवाराला दिले आहे.
या यशकथेने ग्रामीण भागातील युवकांसाठी नवा आदर्श निर्माण केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here