२६ दिवसांचे मौन अखेर फुटले : झेंडेपार लोहखनिज चोरीप्रकरणी गुन्हा दाखल

127

२६ दिवसांचे मौन अखेर फुटले : झेंडेपार  लोहखनिज चोरीप्रकरणी गुन्हा दाखल
– जिल्हाधिकाऱ्यांच्या कडक भूमिकेमुळे खनिकर्मातील ‘त्या’ अधिकाऱ्याचा डाव फसला
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील झेंडेपार येथील शासकीय डोंगरातून लोहखनिजाचे अवैध उत्खनन करणाऱ्या ‘अजंता मिनरल्स’ विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासनाला तब्बल २६ दिवसांचा कालावधी लागल्याने खळबळ उडाली आहे. अखेर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कडक पवित्रा घेतल्याने १२ जानेवारी रोजी कंपनीच्या पदाधिकाऱ्यांसह स्थानिक साथीदारांवर गुन्हा नोंदवण्यात आला.
१७ डिसेंबरच्या रात्री अजंता मिनरल्सचा मॅनेजर व बेतकाठी येथील लालसाय सरपा यांनी नऊ मजुरांच्या मदतीने झेंडेपार येथील सर्व्हे क्रमांक ८२ मधून लोहखनिजाची चोरी सुरू केली होती. सुमारे एक लाख रुपये किमतीचे अर्धा ब्रास खनिज ट्रॅक्टरमध्ये भरले जात असताना जागृत स्थानिक नागरिकांनी हा प्रकार उघडकीस आणला. नागरिकांनी ट्रॅक्टर पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला होता. या घटनेबाबत त्याचवेळी वृत्तही प्रकाशित झाले होते.
विशेष म्हणजे, १८ डिसेंबर रोजीच तहसीलदारांनी घटनास्थळी पंचनामा करून अवैध उत्खननामागे अजंता मिनरल्सचाच हात असल्याचा स्पष्ट अहवाल प्रशासनाला सादर केला होता. असे असतानाही गुन्हा नोंदविण्यास तब्बल तीन आठवडे विलंब का झाला, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खनिकर्म विभागातील एका वादग्रस्त अधिकाऱ्याने हे प्रकरण दडपण्यासाठी जोरदार ‘फिल्डिंग’ लावली होती. मात्र जिल्हाधिकारी पंडा यांनी थेट हस्तक्षेप केल्याने या अधिकाऱ्याचे मनसुबे उधळले गेले. या कथित अधिकाऱ्यामुळे जिल्हा प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असून, याआधीही त्याने खनिज माफियांना पाठीशी घातल्याचे आरोप आहेत.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्याने अवैध उत्खनन माफियांमध्ये खळबळ उडाली असून, ‘विलंबाला जबाबदार कोण?’ याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #IllegalMining #IronOreTheft
#AjantaMinerals #MiningScam #GovernmentLandLoot #Zendepar #Korchii #Gadchiroli #DistrictCollectorAction #AdministrativeAction
#ExposeMiningMafia #CorruptionExposed #RuleOfLaw #PublicAlert #BreakingNews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here