गुन्हे तपासात तांत्रिक क्रांती : गडचिरोली पोलिस दलात अत्याधुनिक ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ दाखल

165

– पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते व्हॅनचे अनावरण; गुन्हे उकलण्यात मिळणार गती आणि अचूकता
The गडविश्व
गडचिरोली, दि. ७ : गडचिरोली जिल्ह्यातील गुन्हे तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेत आमूलाग्र बदल घडविण्यासाठी आजपासून अत्याधुनिक ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ कार्यरत झाली आहे. पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांच्या हस्ते या व्हॅनचे अनावरण पोलीस अधीक्षक कार्यालयात संपन्न झाले.
राज्य शासनाच्या धोरणानुसार व मा. महासंचालक (न्याय व तांत्रिक) यांच्या वतीने ही व्हॅन गडचिरोली जिल्ह्यास उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ नुसार सात वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षेच्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक पुरावे अनिवार्य करण्यात आले असून, या पार्श्वभूमीवर ही सुविधा गुन्हे तपासात मोलाची ठरणार आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले, “फॉरेन्सिक विज्ञानाचा वापर करून तपास यंत्रणा अधिक पारदर्शक आणि सक्षम करणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. ही व्हॅन गुन्ह्यांच्या उकलात न्यायवैद्यकीय सहाय्य पुरवून तपास जलद आणि प्रभावी बनवेल.”
या व्हॅनमध्ये डिजिटल फॉरेन्सिक, डीएनए सॅम्पलिंग, फोटोग्राफी, व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि क्राईम सीन मॅपिंग यांसारखी अत्याधुनिक उपकरणे बसविण्यात आली आहेत. त्यामुळे गुन्ह्याच्या ठिकाणीच पुरावे संकलित करून त्वरित विश्लेषण आणि प्राथमिक अहवाल तयार करणे शक्य होईल. या तंत्रज्ञानामुळे तपास प्रक्रियेत वेळेची बचत होऊन वैज्ञानिक तपासात अधिक पारदर्शकता आणि विश्वासार्हता निर्माण होणार आहे.
भविष्यात गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागासाठी अशा मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा मानस असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
अनावरणप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) शगोकुल राज जी., तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. अरुण फेगडे, मपोउपनि. नेहा हांडे आणि इतर अधिकारी-अंमलदार उपस्थित होते.

अशी कार्य करणार फॉरेन्सिक मोबाईल व्हॅन

गुन्हा नोंदविल्यानंतर नियंत्रण कक्ष फॉरेन्सिक पथकाला सूचित करेल. पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचून क्राईम सीन, ॲप्लिकेशनमध्ये गुन्ह्याची माहिती अद्ययावत करेल. फॉरेन्सिक तज्ज्ञ घटनास्थळाची छायाचित्रे व व्हिडिओद्वारे नोंद करून नमुने गोळा करतील. नंतर क्राईम सीन रिपोर्ट तयार करून तो तपास अधिकाऱ्याकडे सुपूर्द केला जाईल.
या अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅनमुळे गडचिरोली जिल्ह्यातील गुन्हे तपास यंत्रणेला मिळणार आहे तांत्रिक बळकटी — आणि न्याय मिळणार अधिक जलद, अधिक खात्रीशीरपणे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #TheGadVishva #GadchiroliPolice #ForensicVan #ScientificInvestigation #CrimeDetection

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here