मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी गेवर्धा ग्रामपंचायतीची तालुका स्तरीय पाहणी
– मूल्यांकन समितीकडून विविध विकासकामांचा आढावा; गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १० : ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ व्हावी या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षातील उत्कृष्ट ग्रामपंचायत निवडीसाठी तालुका स्तरीय मूल्यांकन समितीने गेवर्धा ग्रामपंचायतीची पाहणी केली. पंचायत समिती कळंब, जिल्हा यवतमाळ येथील समितीने ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देत प्रशासन व विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.
या तपासणी समितीत गटविकास अधिकारी भूपेंद्र बाहेकर, गटशिक्षणाधिकारी अमोल वरवे तसेच विस्तार अधिकारी (पंचायत) मारोती वायगोकर यांचा सहभाग होता. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत प्रशासक सौ. सुषमा मडावी उपस्थित होत्या.
यावेळी गावातील गुणवंत विद्यार्थी प्रथमेश कैलास मैंद याचा ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. श्रीराम कनिष्ठ महाविद्यालय, कुरखेडा येथे शिक्षण घेत असलेल्या प्रथमेशने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बारावी कला शाखेत 85 टक्के गुण मिळवून गडचिरोली जिल्ह्यात द्वितीय तर कुरखेडा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला. त्याबद्दल त्याला शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामकोष समिती, तंटामुक्त समिती, सामूहिक वनहक्क ग्रामसभा पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती, अंगणवाडी सेविका, महिला ग्रामसंघ, महिला बचत गट तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे संचालन ग्रामपंचायत अधिकारी देवानंद भोयर यांनी केले, तर आभार प्रशासक समिती सदस्य रोशन सय्यद यांनी मानले.














