गडचिरोली : मेंढा हत्याकांडाचा अवघ्या १२ तासांत पर्दाफाश, दोन आरोपी जेरबंद

197

गडचिरोली : मेंढा हत्याकांडाचा अवघ्या १२ तासांत पर्दाफाश, दोन आरोपी जेरबंद
– तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे खुनाचा उलगडा, विधीसंघर्षीत बालकही ताब्यात
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : तालुका मुख्यालयापासून जवळच असलेल्या मेंढा येथे घडलेल्या महिला हत्याकांडाचा अवघ्या १२ तासांत छडा लावत गडचिरोली पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशन गडचिरोलीच्या संयुक्त तपास पथकाने दोन आरोपींना अटक केली असून एका विधीसंघर्षीत बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे पोलिसांच्या तपास कौशल्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
८ मे २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास मेंढा, ता. गडचिरोली येथे अक्षय भानारकर यांच्या राहत्या घरी शामकला सुखदेव किरंगे (रा. हिडदा, ता. कुरखेडा) यांचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेनंतर पोलीस स्टेशन गडचिरोली येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यांनी तातडीने तपास यंत्रणा सक्रिय केली. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहिती, मोबाईल लोकेशन आणि गोपनीय सूत्रांच्या मदतीने संशयित सुदामा रामभाऊ चौधरी याचा माग काढत त्याला चंद्रपूर येथून ताब्यात घेतले.
सखोल चौकशीत सुदामा चौधरी याने पूर्ववैमनस्यातून आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने शामकला किरंगे यांचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी सुदामा रामभाऊ चौधरी (वय ३३, रा. शिरसगाव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) तसेच चेतन धर्माराव खोब्रागडे (रा. इंदिरानगर, गडचिरोली) यांना अटक केली. याशिवाय एका विधीसंघर्षीत बालकाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू असून विधीसंघर्षीत बालकाला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल तराळे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, सपोनि. भगतसिंग दुलत, पोनि. विनोद चव्हाण, पोउपनि. शिवाजी देशमुख, माधुरी मिसाळ, भावना राऊत तसेच अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली.
गंभीर गुन्ह्याचा अल्पावधीत छडा लावून आरोपींना अटक करण्यात यश मिळवल्याबद्दल पोलीस अधीक्षक यांनी संपूर्ण तपास पथकाचे कौतुक केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here