तब्बल २३ वर्षांनंतर पुन्हा भरली शाळा ; ‘मित्रोत्सवा’त रंगल्या जुन्या आठवणी
The गडविश्व
भद्रावती, दि. ११ : सरस्वती विद्यालय, मुधोली येथील सन २००१ ते २००३ या काळातील इयत्ता ८ वी ते १० वीच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २३ वर्षांनंतर एकत्र येत “मित्रोत्सव” माजी विद्यार्थी मेळाव्याचे उत्साहपूर्ण आयोजन केले. हा भावनिक आणि संस्मरणीय मेळावा १० मे २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावितीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. स्वागत गीताने शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. यानंतर सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
मेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा देताना माजी विद्यार्थी भावुक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शालेय जीवनातील अनुभव, मैत्री, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि वर्गातील आठवणींनी वातावरण भारावून गेले. सविता नरुकर यांनी सादर केलेल्या स्वरचित गीताने कार्यक्रमात विशेष रंग भरला.
यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेबद्दलची आपुलकी व्यक्त करत शाळेच्या रंगरंगोटीसाठी आर्थिक मदतही जाहीर केली. “ज्या शाळेत आम्ही घडलो, त्या शाळेसाठी फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून योगदान देऊ,” अशी भावना माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
खेळ, नृत्य, गप्पा आणि जुन्या आठवणींमध्ये संपूर्ण दिवस आनंदात गेला. “आजचा दिवस आयुष्यभर स्मरणात राहील,” अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना आशीर्वाद देत सुख-दुःख एकमेकांसोबत वाटून घेण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तत्कालीन मुख्याध्यापक डोंगरे सर होते. प्रमुख अतिथी म्हणून सरस्वती विद्यालय मुधोलीचे मुख्याध्यापक खोंड, सरस्वती विद्यालय सालोरीचे मुख्याध्यापक धारने यांच्यासह झाडे, श्रीरामे के, सावसाकडे, शेख, राणे, गेडाम, रामटेके मॅडम, गुलाबभाऊ घरत, कुंदन जनबंधू, बावणे आणि अरुण सावसाकडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निकेश टेंभुर्णे यांनी केले. सूत्रसंचालन अमोल जिवतोडे व सुनीता जिवने यांनी तर आभार संजय बावणे यांनी मानले.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी माधव चौखे, कलाम शेख, शंकर राणे, शंकर घरत, विकास जिवतोडे, नरेश श्रीरामे, शांताराम ननावरे, अमरदीप जांभुळे, गजू केदार, मंगेश मानकर, अंकुश आत्राम, शोभा मेश्राम, मंजुषा ताजने, सविता नरुकर, मंगला झाडे आणि इतर मित्रपरिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.














