जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोरची पोलिसांचा हरित संकल्प ; वृक्षारोपणासह जनजागृती रॅली
The गडविश्व
ता. प्र / कोरची, दि. ०६ : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कोरची पोलिसांनी वृक्षारोपण व जनजागृती रॅलीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. गडचिरोली जिल्हा पोलीस दलांतर्गत पोलीस स्टेशन कोरचीच्या वतीने आयोजित या उपक्रमात पोलीस अधिकारी, कर्मचारी, एसआरपीएफ जवान, गावातील प्रतिष्ठित नागरिक, सरपंच व पोलीस पाटील यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ७ वाजता पोलीस स्टेशन परिसरात पर्यावरण संरक्षणाची शपथ घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर “एक व्यक्ती – एक वृक्ष” या संकल्पनेतून पोलीस स्टेशन परिसरात आंब्याच्या ४५ फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी हरित क्षेत्र वाढविणे, पर्यावरणाचा समतोल राखणे आणि भावी पिढ्यांसाठी स्वच्छ व निरोगी पर्यावरण निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.
यानंतर पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि प्लास्टिकमुक्त परिसर निर्मितीबाबत जनजागृती करण्यासाठी कोरची पोलीस स्टेशन ते शहर परिसरात रॅली काढण्यात आली. सहभागींकडून पर्यावरण संवर्धन, प्लास्टिकचा वापर टाळणे, नैसर्गिक संसाधनांचे जतन करणे आणि स्वच्छता राखण्याबाबत जनतेला आवाहन करण्यात आले.
उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण झाली. पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेऊन वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन यावेळी कोरची पोलिसांच्या वतीने करण्यात आले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














