धानोरा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न

25

धानोरा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ११ : किसान भवन, धानोरा येथे आयोजित करण्यात आलेले ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या शिबिरात विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना हक्काची प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली तसेच नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.
या शिबिराचे अध्यक्षस्थान आमदार डॉ. नरोटे यांनी भूषविले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, सामान्य नागरिकांची शासकीय कामे सुलभ व्हावीत आणि विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावा, हा या शिबिरामागील मुख्य उद्देश आहे. धानोरा परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी भविष्यात धानोरा येथे आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी ‘आदिवासी जतन केंद्र’ उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच सर्व शासकीय व सामाजिक कार्यक्रमांसाठी उपयुक्त ठरेल असे अत्याधुनिक व सुसज्ज सभागृह उभारण्याचा मानस व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी शेती पाणंद रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला समाजसेवक देवाजी तोफा, भाजप किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेश भुरसे, भाजपा प्रदेश सदस्य प्रमोद पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, तालुकाध्यक्ष साजन गुंडावार, जिल्हा सचिव सारंग साळवे, नगरसेवक संजय कुंडू, कोषाध्यक्ष सुभाष धाईत, नगरसेविका सौ. भूमिताताई परचाके, सौ. अनुसयाताई कोरेटी, तहसीलदार गणेश माळी तसेच ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक गजभिये यांची प्रमुख उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here