जोडून ठेवलेल्या रेशन दुकानांवर प्रश्नचिन्ह ; बीपीएल महिला बचत गटांना संधी द्या

35

जोडून ठेवलेल्या रेशन दुकानांवर प्रश्नचिन्ह ; बीपीएल महिला बचत गटांना संधी द्या
– रूपेश वलके यांची शासन आणि अन्न नागरी पुरवठा विभागाकडे मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : जिल्ह्यात अनेक वर्षांपासून काही रास्त भाव रेशन दुकाने नियमबाह्य पद्धतीने जोडून ठेवण्यात आल्याने पात्र महिला बचत गट, बेरोजगार युवक तसेच बीपीएल कुटुंबांतील महिलांवर अन्याय होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता तथा रास्त भाव दुकानदार संघटना गडचिरोलीचे सदस्य व कार्यकारी कार्याध्यक्ष रूपेश वलके यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर अशा दुकानांचा तात्काळ जाहीरनामा काढून ती दुकाने बीपीएल महिला बचत गटांना देण्यात यावीत, अशी मागणी त्यांनी शासन आणि अन्न नागरी पुरवठा विभागाकडे केली आहे.
रूपेश वलके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनेक गावांमध्ये रेशन दुकाने वर्षानुवर्षे जोडून ठेवण्यात आली असून त्यासाठी स्वतंत्र जाहीर प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. परिणामी स्थानिक पात्र महिला बचत गटांना रोजगाराची संधी मिळत नसून शासनाच्या महिला सक्षमीकरणाच्या धोरणालाही यामुळे बाधा पोहोचत आहे.
महिला बचत गटांना रास्त भाव दुकाने दिल्यास ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक स्वावलंबन प्राप्त होईल, स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीला चालना मिळेल तसेच रेशन वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणि जबाबदारी वाढण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
तसेच, ज्या रेशन दुकानांचे अनेक वर्षांपासून नूतनीकरण झालेले नाही किंवा स्वतंत्र जाहीर प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही, अशा सर्व दुकानांची चौकशी करून पात्र आणि गरजू महिला बचत गटांना न्याय देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी शासनाकडे केली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here