कोरची : तेंदूपत्ता तोडणीदरम्यान रानडुकराच्या हल्ल्यात तिघे जखमी

52

कोरची : तेंदूपत्ता तोडणीदरम्यान रानडुकराच्या हल्ल्यात तिघे जखमी
The गडविश्व
ता. प्र/ कोरची, दि. १० : तालुक्यातील बोडेना जंगल परिसरात तेंदूपत्ता तोडणीसाठी गेलेल्या मजुरांवर रानडुकरांनी अचानक हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना शनिवार (०९) सकाळी घडली. या हल्ल्यात एका महिलेसह तिघेजण जखमी झाले असून त्यापैकी एक महिला गंभीर जखमी झाली आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे जंगल परिसरात एकच गोंधळ उडाला असून तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात जाणाऱ्या मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोडेना जंगल परिसरात सुमारे १५ ते २० नागरिक तेंदूपत्ता तोडणीचे काम करत होते. दरम्यान, जंगलातून अचानक बाहेर आलेल्या रानडुकरांनी नागरिकांच्या दिशेने धाव घेत हल्ला केला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे अनेक मजुरांनी जीव वाचवण्यासाठी जंगलातून पळ काढला.
या हल्ल्यात पुष्पा कालिदास भैसारे (वय ५०, रा. कोरची) या महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. तसेच कृष्णा पडोटी (वय ५५, रा. कोरची) आणि नंदकिशोर बोरकर (वय ५५, रा. भीमपूर) हे देखील जखमी झाले आहेत. गंभीर जखमी महिलेला ग्रामस्थांनी तत्काळ दुचाकीच्या सहाय्याने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, रानडुकरांनी थेट मजुरांच्या दिशेने धाव घेत हल्ला सुरू केला. काही वेळ जंगल परिसरात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर अनेकांनी तेंदूपत्ता तोडणीचे काम अर्धवट सोडून गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, कोरची तालुक्यात वन्यप्राण्यांचा वाढता वावर चिंतेचा विषय बनला असून वनविभागाने तातडीने सुरक्षा उपाययोजना वाढवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here