धानोऱ्यातील तालुका क्रीडा संकुलाचे निकृष्ट काम उघड ; चौकशीची जोरदार मागणी

73

धानोऱ्यातील तालुका क्रीडा संकुलाचे निकृष्ट काम उघड ; चौकशीची जोरदार मागणी
– बांधकाम संथगतीने, खेळाडू सरावाविना, तहसीलदारांकडे तक्रार
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ३१ : धानोरा शहरात मंजूर झालेल्या तालुका क्रीडा संकुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून काम अत्यंत संथगतीने किंवा पूर्णतः थांबलेल्या अवस्थेत आहे. खेळाडूंसाठी उभारण्यात येणारे हे संकुल प्रत्यक्षात ‘थंड बस्त्यात’ पडल्याने सदर बांधकामाची सखोल चौकशी करण्याची मागणी तहसीलदारांकडे सादर केलेल्या तक्रारीतून करण्यात आली आहे.
तालुकास्तरावर दर्जेदार खेळाडू घडावेत, त्यांना मैदान, धावपट्टी व आवश्यक सोयी-सुविधा एकाच छताखाली मिळाव्यात, या उद्देशाने या क्रीडा संकुलाच्या कामाला सुरुवात झाली होती. मात्र, सुरुवातीच्या टप्प्यानंतरच या प्रकल्पाला जणू ग्रहण लागले असून आजही संकुलाचे काम अपूर्ण आहे.
राज्य सरकारच्या धोरणानुसार जिल्हा व तालुकास्तरावर क्रीडा संस्कृती जोपासण्यासाठी निधीची तरतूद केली जाते. परंतु धानोऱ्यात हे धोरण कागदावरच उरल्याचे चित्र दिसत आहे. निधीअभावी काम रखडले की प्रशासकीय उदासीनतेमुळे, असा सवाल क्रीडाप्रेमींमधून उपस्थित होत आहे.

खेळाडू मैदानाविना, सराव रस्त्यावर

धानोरा परिसरातील युवकांमध्ये खेळाची प्रचंड ओढ आहे. मात्र मैदानाअभावी अनेक खेळाडूंना रस्त्यावर किंवा मिळेल त्या जागेत सराव करावा लागत आहे. क्रीडा संकुल वेळेत पूर्ण झाले असते, तर खेळाडूंना मोठा दिलासा मिळाला असता, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून क्रीडा संकुलाचे काम सुरू आहे. काम सुरू करण्यापूर्वी त्या ठिकाणी क्रिकेटचे दोन पिच (नेट पिच व ओपन सिमेंट पिच) तसेच व्हॉलीबॉल नेटसह क्रीडांगण उपलब्ध होते. ठेकेदारांनी हे सर्व नव्याने व अधिक दर्जेदार स्वरूपात उभारून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, एक वर्ष उलटूनही नियोजित लेव्हलनुसार काम पूर्ण झालेले नाही. क्रिकेटचे सिमेंट नेट पिच व ओपन पिच तयार करण्यातही दिरंगाई होत असल्याचा आरोप आहे.
दरम्यान GDPL (लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडद्वारे संचालित) स्पर्धेत धानोरा संघ सहभागी असतानाही क्रीडांगणाच्या अभावामुळे क्रिकेट सराव करता येत नसल्याचे खेळाडूंनी नमूद केले आहे. त्यामुळे तातडीने दखल घेऊन योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ही तक्रार भूषण भैसारे, देवनंद ठाकरे, प्रेमदास पाटणकर, दीपक करकाडे, संघम उंदिवाडे, आकाश पुडो, निशांत सोनटक्के, प्रणय मांदाळे, वैभव ठाकर, मोहित आलम, नमन महाडोरे, देवेंद्र बढई, मंथन शेंडे, तुषार उसेंडी, अभिषेक गावडे, राम झंझाड, हिमांशु धनगुन, स्वागत रामटेके, लोकेश कपुरडेहरिया, गणेश बारसागडे, पवन मडावी, शुभम नैताम, सुशील श्रीपदवार, सैरभ श्रीपदवार, चंदन दुर्गावासी, भूषण मेश्राम, प्रशांत कोडाप, राहुल दिवटे, नकुल बारीकर, कार्तीक लाडे, दीपक पद, निखिल मेश्राम, रोशन टेकाम, यश कुमरे, हिमांशु उईके आदी खेळाडू व क्रीडाप्रेमींनी संयुक्तपणे दिली आहे.
क्रीडा संकुलाच्या निकृष्ट कामाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई केली जाईल का, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here