जिद्दीच्या बळावर दुर्गम वसतिगृहातून ‘क्लास वन’पर्यंत झेप : नावजी सरकुंडेंचा प्रेरणादायी यशप्रवास
The गडविश्व
ता. प्र / कोरची, दि. ३१ : दारिद्र्य, मर्यादित साधनसुविधा आणि अतिदुर्गम भागातील नोकरी या साऱ्या अडथळ्यांवर मात करत हिंगोली जिल्ह्यातील सुकळी (वीर) येथील आदिवासी युवक नावजी दत्ता सरकुंडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम आदिवासी भागातील वसतिगृहात गृहपाल म्हणून सेवा बजावत असतानाच त्यांनी ‘सहाय्यक आयुक्त (वर्ग-१)’ पदापर्यंत मजल मारली असून, हा प्रवास संपूर्ण आदिवासी समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
संघर्षातून घडलेले शिक्षण
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि आंध जमातीतील नावजी सरकुंडे यांनी जिल्हा परिषद शाळा, सुकळी येथे प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर शासकीय आदिवासी आश्रमशाळा, जमगव्हाण (हिंगोली) येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथून बी.एस.डब्ल्यू. व एम.एस.डब्ल्यू. पदवी संपादन केली. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने शिक्षणासोबत नोकरीचा मार्ग त्यांनी स्वीकारला.
शिपाई ते गृहपाल… आणि पुढे ‘क्लास वन’
नांदेड न्यायालयात शिपाई म्हणून कारकीर्द सुरू करतानाच त्यांनी स्वप्न जपले. पुढे आदिवासी विकास विभागाची परीक्षा उत्तीर्ण होऊन नागपूर विभागात गृहपाल म्हणून रुजू झाले. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात सेवा बजावताना वीज, इंटरनेट व अभ्यास साहित्याच्या मर्यादांमध्येही त्यांनी MPSC ची तयारी सुरू ठेवली. अखेर २०२३ मधील प्रकल्प अधिकारी/सहाय्यक आयुक्त परीक्षेत त्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. लवकरच ते मागासवर्गीय विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत.
विद्यार्थ्यांसाठी जिवंत प्रेरणा
या यशाच्या आनंदात शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, कोरची येथे विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. मुख्याध्यापक उमाकांत ढोक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सरकुंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “कठीण परिस्थितीतही शिक्षणाची कास धरून सातत्याने मेहनत करा यश नक्कीच मिळते,” असा संदेश दिला. मुख्याध्यापक ढोक म्हणाले, “दुर्गम भागात नोकरी सांभाळून स्पर्धा परीक्षेची तयारी करणे मोठे आव्हान आहे. सरकुंडे सरांनी आदिवासी युवकांसमोर आदर्श उभा केला आहे.”
कार्यक्रमास शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुषमा आंबोणे यांनी तर आभार मनोज आचार्य यांनी मानले. या प्रसंगी हरेश कामडी, अरुण कायंदे, धनश्री परतेती, भैयालाल कुरसंगे, गुरुराज मेंढे, कुणाल गोवर्धन, कृष्णा गावडे, संतोष सहारे, अमित मेश्राम, गीता राऊत, सुषमा आंबोणे, प्रिती खंडाते, नैना यंगलवार, भूमेश शेंडे, मयूर दोनाडकर, प्रथमेश पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
दुर्गम कोरची–गडचिरोलीपासून सुरू झालेला नावजी सरकुंडेंचा हा जिद्दीचा प्रवास आज संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी तरुणांसाठी आशा, आत्मविश्वास आणि प्रेरणेचा दीप ठरत आहे.













