कुरखेडा : दुकानात घुसून कुटुंबीयांना मारहाण, बानाईत कुटुंबावर कठोर कारवाईची मागणी
– पत्रकार परिषदेत पीडित हिरकणी नागरीकर यांचा आरोप
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ३१ : क्षुल्लक वादातून हॉटेल व्यावसायिक आनंद बानाईत, त्यांचा भाऊ व मुलांनी लगतच्या दुकानात घुसून सख्खे नातेवाईक धनराज निमकर यांना बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीत बचावासाठी पुढे आलेल्या पत्नी व मुलगी हिरकणी नागरीकर यांनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप पीडित मुलगी हिरकणी नागरीकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला.
या प्रकरणात पोलिसांनी आरोपींविरोधात कठोर कारवाई न करता केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने न्याय न मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. २६ जानेवारी रोजी सायंकाळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र चौकशीसाठी केवळ आनंद बानाईत व त्यांच्या भावालाच बोलावण्यात आले, तर मारहाणीत सहभागी असलेल्या त्यांच्या दोन मुलांची चौकशीच करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला.
न्याय मिळावा यासाठी पीडित कुटुंबाने पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे धाव घेत आपली फिर्याद मांडली. तेथे स्वतंत्रपणे तक्रार नोंदवून कारवाईचे आश्वासन देण्यात आले होते. तथापि, सहा दिवसांचा कालावधी उलटूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने पीडित कुटुंबात तीव्र नाराजी आहे. बानाईत कुटुंबाकडून पुन्हा हल्ला होण्याची भीती व्यक्त करत पोलिसांनी तातडीने खबरदारी घेऊन आवश्यक कठोर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत हिरकणी नागरीकर यांनी केली.
दरम्यान, तक्रारदार धनराज निमकर यांच्या मारहाण व शिवीगाळीच्या तक्रारीवरून तसेच वैद्यकीय अहवालाच्या आधारे बीएनएस कलम ११५(२), ३५२, ३५१(२), २(५) अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच२९ जानेवारी रोजी अश्लील शिवीगाळ व भांडणात कपडे फाडल्याच्या तक्रारीवरून मुलीच्या उपस्थितीत वडिलांचे ऑन-कॅमेरा बयान नोंदविण्यात आले असून, न्याय दंडाधिकारी कुरखेडा यांच्याकडून बीएनएस कलम १७४(२) अन्वये तपासाची परवानगी घेण्यात आली आहे. सदर प्रकरणात पुढील तपास करून कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती ठाणेदार महेंद्र वाघ यांनी दिली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













